महाराष्ट्र-तेलंगणदरम्यान हैदराबादेत बैठक
By admin | Published: March 20, 2016 02:28 AM2016-03-20T02:28:44+5:302016-03-20T02:28:44+5:30
महाराष्ट्र आणि तेलंगणदरम्यान आंतरराज्य प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यगटाची पहिली बैठक शनिवारी हैदराबादमध्ये झाली. गोदावरी आणि प्राणहिता
मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगणदरम्यान आंतरराज्य प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यगटाची पहिली बैठक शनिवारी हैदराबादमध्ये झाली. गोदावरी आणि प्राणहिता नदीवरील प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात या वेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, तेलंगणचे जलसंपदा प्रधान सचिव एस. के. जोशी यांच्यात झालेल्या या बैठकीला दोन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, तुमडीहट्टी बॅरेजची उंची १४८ मीटर तर मेडीगट्टा बॅरेजची उंची १०० मीटर ठेवण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. तेलंगणने सर्व प्रकल्पांसाठी पर्यावरण, खनिकर्म आणि वनविषयक मान्यता लवकरात लवकर मिळवाव्यात आणि विस्तृत अहवाल द्यावा, असे महाराष्ट्राकडून सांगण्यात आले. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. बी. शुक्ला हेही बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राची गावे पाण्याखाली मोठ्या प्रमाणात जात असून, प्रकल्पांचा फायदा मात्र तेलंगणला अधिक होणार असल्याची भावना जनतेत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)