कचरा उचलायलाही बैठक पे बैठक!
By admin | Published: July 22, 2016 02:38 AM2016-07-22T02:38:06+5:302016-07-22T02:38:06+5:30
औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे.
कल्याण : डोंबिवली आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे. एमआयडीसीच्या हद्दीतील कचरा पालिकेने उचलायचा कसा, त्याचा खर्च कोण देणार, या मुद्द्यावर गाडे अडले असून त्यासाठी पालिका-एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
डोंबिवली-अंबरनाथच्या प्रदूषणाचा विषय हरित लवादाने उचलून धरल्यावर नेमक्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट दिली होती, तेव्हा त्यांनी हे आदेश दिले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने कचरा आहे, त्याच जागेवर पडून आहे. तो एमआयडीसीने उचलायचा की महापालिकेने, याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. बदलापूर-शीळ रस्त्यालगतही त्यांना कचरा आढळला होता. हाच कचरा औद्योगिक परिसरातील नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हा कचरा तातडीने हटवण्याचे आदेश कदम यांनी दिले होते.
डोंबिवलीतील औद्योगिक कारखान्यांचा परिसर पालिका हद्दीत आला असला, तरी त्यातील काही भागासाठी एमआयडीसी नियोजन प्राधिकरण आहे. तेथे सुविधा पुरवण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र, एमआयडीसी ते करत नाही. आलेला निधी त्यांच्याकडून खर्च केला जात नाही. त्यातच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांची भेट घेतली. त्यानंतर तोरस्कर यांनी सांगितले, पालिका आपल्या क्षेत्रातील कचरा उचलण्यास तयार आहे. एमआयडीसीने त्यांच्या हद्दीतील कचरा उचलावा. हा कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न आहेच. त्यामुळे एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल.
मुख्याधिकारीही शांत
बदलापूर-शीळ मार्गावरील कचरा उचलावा, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावताना त्यात त्यांनी पर्यावरणमंत्र्यांचा पाहणी दौरा व आदेशाचा उल्लेख केला होता.