कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:03 AM2019-12-20T05:03:17+5:302019-12-20T05:03:35+5:30
अधिकाऱ्यांनी केले सादरीकरण, आणखी एक बैठक होणार
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओल्या दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी स्वत: शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपुरात बैठक घेतली. अधिकाºयांनी सादरीकरण केले. शरद पवार यांनी आणखी तपशील आणण्यासाठी सांगितले. यासाठी पुन्हा एकदा मुंबईत बैठक होणार आहे.
ओल्या दुष्काळामुळे कोणत्या विभागात किती नुकसान झाले आहे, पंचनामे किती ठिकाणचे झाले आहेत, एकूण किती नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे, याची सगळी आकडेवारी विचारण्यात आली. अधिकाºयांनी काही माहिती समोर ठेवली. एकूण किती आर्थिक भार सरकारवर या कर्जमाफीमुळे पडेल अशीही विचारणा यावेळी करण्यात आली. कर्जमाफी किती टक्के द्यायची, संपूर्ण कर्जमाफीसाठी किती बोझा पडेल, सातबारा कोरा करायचा म्हणजे नक्की काय करायचे, असे प्रश्नही यावेळी चर्चेत आले. आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, मात्र आणखी एक बैठक यासाठी होणार आहे. गुरुवारी शहरात काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे होते. त्यांचे काही कार्यक्रम असल्यामुळे काँग्रेसचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या बैठकीला हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक होईल.
कर्जमाफीसाठीची आजची ही बैठक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी झाली. त्यात कर्जमाफीसाठी काय करता येईल यासाठी सादरीकरणही झाले. बैठकीला वित्तमंत्री जयंत पाटील, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, सहकार सचिव आभा शुक्ला, वित्तसचिव राजीव मित्तल यांची उपस्थिती होती.