साखर उद्योगाबाबत मुंबईत आज बैठक
By admin | Published: June 10, 2015 02:11 AM2015-06-10T02:11:27+5:302015-06-10T02:11:27+5:30
उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे.
पुणे : उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होत आहे.
मुख्यमंत्री या प्रश्नावर सर्वांची मते जाणून घेतील. त्यात तोडगा न निघाल्यास एफआरपीचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पॅकेजच्या घोषणेची अजून सरकारने अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उसाच्या पॅकेजची घोषणा झाली होती. मात्र, घोषणेपलीकडे या प्रश्नावर काहीच झालेले नाही. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे चुकते करावेत, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कारखान्यांसोबत जवळपास नऊ फेऱ्यांमध्ये सुनावणी झाली आहे. त्यातून काही शेतकऱ्यांना बिलेही मिळाली आहेत. मात्र, अनेक कारखान्यांनी पॅकेज मिळेल तेव्हा बघू, अशी भूमिका घेतली आहे. पॅकेजचा निर्णय होत नसल्याने साखर आयुक्तांनाही आक्रमक भूमिका घेणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)