अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाली बैठक
By admin | Published: October 31, 2014 06:19 PM2014-10-31T18:19:22+5:302014-10-31T19:51:08+5:30
शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठक झाल्याचे वृत्त असून या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी चर्चा झाल्याचे समजते.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेली तणातणी शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामुळे संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठक झाल्याचे वृत्त असून या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी चर्चा झाल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मतभेद दिवसेगणिक वाढत आहेत. भाजपाने सर्वाधिक जागा पटकावत सरकार स्थापन केले असले तरी बहुमतासाठी भाजपाला आणखी २२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. मात्र मंत्रिपद आणि खातेवाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. भाजपा नेत्यांनी शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्यास नकार दिल्याने तणाव आणखीन वाढला. याची परिणती म्हणजे शिवसेनेने भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अखेर दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी फोनवर चर्चा केली व उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले.
उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित राहिल्याने भाजपाला दिलासा मिळाला आहे. विधानसभेत विश्वास दर्शक ठरावात भाजपाला शिवसेनेची गरज भासू शकते. यापार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.