पालिकेत ९ मार्च रोजी रंगणार निरोपाची सभा
By admin | Published: March 4, 2017 12:43 AM2017-03-04T00:43:21+5:302017-03-04T00:43:21+5:30
महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षांत सभासदांनी पार पाडलेली विकासकामे, सभागृहाचे कामकाज यांना उजाळा देत निवडून न आलेल्या सदस्यांना निरोप दिला जाणार आहे.
महापालिकेच्या १५२ सदस्यांच्या सभागृहात ६७ नगरसेवक पुन्हा निवडून येण्यात यशस्वी ठरले; मात्र उर्वरित ८५ नगरसेवक नवीन सभागृहामध्ये नसतील. त्यांपैकी काहींनी निवडणूक लढवलेली नाही, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर निरोपाची सभा ९ मार्च राजी रंगणार आहे. सध्याच्या महापालिका सभागृहाची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या सभासदांची मुख्य सभा अस्तित्वात येईल.
महापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया पार पडेल. महापालिकेमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविलेले असल्याने आता केवळ भाजपाकडून महापौरपदाच्या उमेदवारीसाठी कोणाची निवड केली जाते, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आदी पदांवरील उमेदवारांच्या निवडीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपाकडून उमेदवारांच्या निवड केली जाण्याची शक्यता आहे.
>महापौरपदासाठी ८ मार्च रोजी अर्ज भरले जाणार
नवीन महापौरांची निवड १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता केली जाईल. त्यानुसार महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ८ मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील. १५ मार्च रोजी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत अर्ज माघारी घेता येतील. त्यानंतर ११.३० वाजता निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होऊन नवीन महापौरांची निवड होईल.
>गोंधळाला आळा घालण्यासाठी नवी नियमावली
महापालिका सभागृहात होणाऱ्या गोंधळाला आळा बसावा म्हणून सभागृह कामकाजाची नवी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. नव्या सभागृहातील महापौर व सभागृह नेत्यांच्या संमतीने हा प्रस्ताव मंजूर करून नंतर अमलात आणला जाईल. तसेच, सर्व नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती यापुढे बायमेट्रिक पद्धतीनेच नोंदवली जाणार आहे.
सभागृहात काही सदस्यांकडून एखाद्या विषयासंदर्भात गोंधळ घातला जातो. अलीकडे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. महापौरांना काम करू देणे अशक्य केले जाते. त्यामुळे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी तर विधानसभेप्रमाणे महापालिका सभागृहातही मार्शल ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी थेट राज्य सरकारकडेच केली होती. त्याचबरोबर प्रश्नोत्तरांमध्ये वेळ घालवणे, चर्चा लांबवणे असेही प्रकार घडतात. त्यामुळेच सभेच्या कामकाजाला शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने नव्याने सभागृह कामकाज नियमावली तयार केली आहे. महापौर व सभागृह नेत्यांना दाखवून सभागृहाच्या संमतीने ही नियमावली अमलात आणली जाईल, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.
पालिकेच्या मावळत्या सभागृहातील नगरसेवकांच्या सभेतील उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धतीची व्यवस्था केली होती; मात्र फारच थोड्या नगरसेवकांनी त्याला प्रतिसाद दिला. या वेळी मात्र सर्व नगरसेवकांची उपस्थितीची हीच पद्धत केली जाणार असल्याचेही पारखी यांनी स्पष्ट केले. सभागृहाच्या नूतनीकरणाच्या वेळेसच ही व्यवस्था करण्यात आली होती. आता सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्न केले जातील, असे पारखी म्हणाले.