भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची उद्यापासून कोल्हापुरात बैठक
By admin | Published: May 21, 2015 01:58 AM2015-05-21T01:58:18+5:302015-05-21T01:58:18+5:30
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषद शुक्रवारपासून कोल्हापुरात होत आहे.
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषद शुक्रवारपासून कोल्हापुरात होत आहे. या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत.
शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात प्रदेश कार्यकारिणी आणि राज्य परिषदेची बैठक होणार आहे. या कार्यस्थळाला ‘केंद्रीय मंत्री व भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. रविवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यकारिणी व राज्य परिषदेला ‘झेप’ हे नाव देण्यात
आले आहे, अशी आ. सुरेश हाळवणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
रेसिडेन्सी क्लब येथे शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणाऱ्या बैठकीस अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, दानवे, राज्यातील भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी साडेअकरा वाजता अमित शहा, देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यभरातून आलेले सुमारे १ हजार प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यांना सेंद्रीय गुळाची ढेप, कोल्हापुरी चप्पल अशी भेट देण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता अमित शहा हे कॅबिनेट मंत्र्यांकडून आढावा घेणार आहेत. रविवारी राज्य परिषद होऊन समारोप होणार आहे. यासाठी गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यभरातून सुमारे १२ हजार पक्ष प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असेही हाळवणकर म्हणाले.
बैठकीसाठी येणाऱ्या एक हजार व्हीआयपी व दहा हजार कार्यकर्त्यांना सकाळचा नाष्टा म्हणून झणझणीत कोल्हापुरी मिसळ तर, दोन दिवसांच्या जेवणात शाकाहारी बिर्याणीसह नेहमीचाच वरण-भाताचा बेत आखण्यात आला आहे.
राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने २३ व २४ मे रोजी होणाऱ्या या बैठकांसाठी उपस्थित राहणाऱ्या व्हीआयपी व कार्यकर्त्यांचे जेवण हे महाराष्ट्रीयन साध्या पद्धतीचेच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.
व्हीआयपी, नेते यांच्यासाठी मटकी उसळ, बटाटा भाजी, पुरी, साधा भात, वरण, मसालेभात असा बेत ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेवणात गोड पदार्थही असणार नाहीत तर दहा हजार कार्यकर्त्यांचे जेवण केवळ २४ तारखेला करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुर्मा, डाळ, व्हेजिटेबल बिर्याणी, मटकी उसळ, शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी असा बेत असेल.