नववर्षारंभी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून बैठका; विविध विभागांच्या कामाचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:44 AM2024-01-02T11:44:14+5:302024-01-02T11:44:42+5:30
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेत आढावा घेतला. नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे. शासकीय निर्णयांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई : नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी बैठकांच्या माध्यमातून विविध विभागांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या. यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेत आढावा घेतला. नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे. शासकीय निर्णयांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय युवा महोत्सव तयारीचाही आढावा
ठाणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मंत्रालयाकडे रवाना झाले. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचे आगमन झाल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, नाशिक येथे १२ तारखेला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावाही यावेळी घेतला.