पिकवायला सांगता; मग आयात का करता? राजू शेट्टींचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:28 PM2017-07-23T23:28:14+5:302017-07-23T23:28:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण पिकवायला सांगून आयात का केली जाते? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. केंद्र सरकारच्या कृषी आणि आयात -निर्यात धोरणावरही त्यांनी टीका केली.
खासदार शेट्टी हे उस्मानाबाद आणि सोलापूर दौऱ्यावर होते. माढा येथे सर्वाधिक ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. सायंकाळी लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना केंद्राच्या कृषी धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, केंद्रीय कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय एकाच इमारतीत आहेत; पण या दोन्ही मंत्रालयामध्ये समन्वय नाही. देशात डाळीचे उत्पादन वाढले असताना ५ लाख टन डाळ आयात केली आहे. खाद्य तेल, कांद्याची आयात केली जात आहे. गेल्या चार वर्षात २८ हजार कोटी रूपयांची आयात वाढून १ लाख ४० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचली असून, केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.
देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. केंद्राच्या धोरणामुळेच त्याची अस्वस्थता वाढत आहे. शेतीमाल पिकत असताना तो आयात केला जातो आणि शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत येतो. या स्थितीमुळेच शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांची नजर शिवारात, बाजारात आणि राजकारणावर असायला हवी; पण शिवारात पिकणारच नसेल तर अन्य ठिकाणी शेतकरी लक्ष तरी कसा देणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.