आज मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 01:04 AM2017-06-18T01:04:20+5:302017-06-18T11:41:58+5:30
उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, हार्बर मार्गाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक असणार आहे.
मध्य मार्गावर कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. या काळात डाउन जलद मार्गावरील लोकलला सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येईल, तर अप मार्गावरील ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असून, तेथूनच डाउन दिशेला ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन रवाना करण्यात येईल.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष ट्रेन चालविण्यात येतील. मेगाब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मध्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, विरार-वसई रोड ते बोरीवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे, तसेच ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.