ट्रॅफिक ब्लॉकमुळे मेगा हाल
By Admin | Published: October 3, 2016 05:02 AM2016-10-03T05:02:17+5:302016-10-03T05:02:17+5:30
धिम्या मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे, मुंबईकडे जाणारा धिमा मार्ग तब्बल नऊ तास बंद ठेवण्यात आला
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातील जलद लोकलला थांबा देण्यासाठी, धिम्या मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे, मुंबईकडे जाणारा धिमा मार्ग तब्बल नऊ तास बंद ठेवण्यात आला. या पूर्वीच्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे जुन्या फलाट १च्या बाजूला कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यास सुरुवात झाली.
नऊ तासांच्या कामानंतर सायंकाळी ५.३०च्या सुमारास या फलाटावर मुंबईकडे जाणारी पहिली धिमी लोकल थांबली. याच काळात नव्या फलाट १ आणि २वर मुंबईच्या दिशेला लोखंडी जाळी बसवली आहे. यामुळे आता दिवेकरांना पुलावरून ये-जा करावी लागेल.
मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामासाठी सकाळी ८.१५ ते सायंकाळी ५.३० दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेतला. त्यामुळे मुंबई दिशेकडे जाणाऱ्या धिम्या गाड्या कोपर आणि दिवा स्थानकात थांबत नव्हत्या. आधीच रविवारचे वेळापत्रक लागू असतानाही, या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
ंअपघातांमुळे दिवा स्थानकात आंदोलने झाली होती. त्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला, पण त्याचा वापर होता नव्हता. रुळांवरील प्रवाशांची गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे या कामादरम्यान दिवा स्थानकात नव्या फलाट क्रमांक १ आणि २वर मुंबईच्या दिशेला लोखंडी जाळी लावण्यात आली. आता तेथून खाली उतरण्यास ब्रेक लागला आहे. यापुढे प्रवाशांना सक्तीने पुलाचा वापर करावा लागेल. मात्र, तेथील पूल जुना असल्याने गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरीची भीती आहे.