आरोग्य विभागात मेगाभरती; खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:51 AM2021-06-15T06:51:33+5:302021-06-15T08:40:49+5:30
मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठीची ही जाहिरात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करताना मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या वा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी याबाबतचा आदेश काढला.
मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठीची ही जाहिरात होती. त्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या अलीकडच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने हा नवा आदेश काढला आहे.
या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल. एसईबीसी आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी १ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायचा आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात याचा पर्याय देणे आवश्यक राहील. जे पर्याय देणार नाहीत ते खुल्या प्रवर्गात असल्याचे समजले जाईल.
उमेदवारांना लेखी परीक्षा ओळखपत्र १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन दिले जाईल. ७ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा होईल. ८ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी लेखी परीक्षा होईल. ९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जातील.
दिव्यांगांसाठी ४ टक्के
दिव्यांगांसाठीचे आरक्षण २०१६च्या कायद्यानुसार
३ टक्क्यांवरून ४ टक्के झालेले असल्याने सुधारित जाहिरात ही २९ किंवा ३० जून रोजी काढण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट पदांसाठी दिव्यांगांना १ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.