शहापुरात पोलीस पाटीलपदाची मेगाभरती
By Admin | Published: August 2, 2016 03:17 AM2016-08-02T03:17:39+5:302016-08-02T03:17:39+5:30
गावांची सुरक्षा करण्याचा प्रचंड ताण येत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी यांच्या आदेशाने शहापूर तालुक्यातील रिक्त पोलीस पाटीलपदाची मेगाभरती होणार
आसनगाव : शहापूर तालुक्यातील शहापूर, किन्हवली, वासिंद, कसारा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या तब्बल १०४ गावांना पोलीस पाटील नसल्याने पोलिसांवर गुन्ह्यांचा तपास करताना तसेच गावांची सुरक्षा करण्याचा प्रचंड ताण येत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी यांच्या आदेशाने शहापूर तालुक्यातील रिक्त पोलीस पाटीलपदाची मेगाभरती होणार आहे. विशेषत: यातील ३३ टक्के पदे शासनाच्या नियमाप्रमाणे महिलांसाठी राखीव असल्याचे शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भाग सध्या विकसित होत आहे. मुंबईचे बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती यांनी मोठमोठी गृहसंकुले, कारखाने तालुक्यात उभी केली आहेत. यामध्ये स्थानिक जनतेसह परप्रांतीय जनतेचादेखील भरणा अधिक असल्याने व तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कमी असल्याने कधीकधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर दुसऱ्या तालुक्यातून पोलीस बंदोबस्त मागवावा लागत असल्याने अशा परिस्थितीत गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या पोलीस पाटलांचा उपयोग होत असतो.
तालुक्यातील रिक्त असलेल्या १०४ गावांसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, खुला प्रवर्गचे सोडत पद्धतीने आरक्षण नुकतेच भिवंडी येथे निश्चित करण्यात आले. (वार्ताहर)
>शहापूरचे आ. पांडुरंग बरोरा यांच्या पेंढरघोळ व माजी आमदार दौलत दरोडा यांच्या कोठारे गावांनादेखील पोलीस पाटीलपद रिक्त असल्याने चर्चेचा विषय झाला आहे. या पोलीस पाटीलपदासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांची तोंडी परीक्षा होणार असल्याचे तहसीलदार कोष्टी यांनी सांगितले.