मेगाब्लॉकमुळे झाले मेगाहाल
By Admin | Published: June 26, 2017 02:49 AM2017-06-26T02:49:45+5:302017-06-26T02:49:45+5:30
ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान वाहतुकीसाठी केलेली पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. जवळपास दोन तास प्रवासी कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यातील काहींनी रिक्षाने डोंबिवलीला येऊन प्रवास केला, तर काहींनी माघारी जाण्याचा पर्याय स्वीकारला.
रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक कल्याणहून वळविण्यात आली, तर मुंबईहून येणारी लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच नेण्यात येत होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे लूट केली. नेहमी प्रति प्रवासी आकारल्या जाणाऱ्या २४ रुपयांऐवजी ५० रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात होती.
या मेगाब्लॉकमुळे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत जलद वाहतूक बंद राहाणार होती, पण गर्डरच्या कामासाठी मागविलेली हायड्रोलिक क्रेन वारंवार बिघडत असल्याने, जलद मार्ग एक तास उशिरा वाहतुकीसाठी खुला झाला, तर धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ४ अशी सहा तास बंद राहाणार होती. मात्र, गर्डरच्या कामाला विलंब लागत असल्याने, त्याच्या कामाचा अंदाज घेऊन ती वाहतूक तासभर लवकर सुरू करण्यात आली.
मात्र, कल्याण ते डोंबिवलीदरम्यान समांतर रस्ता व्यवस्थित सुरू नसल्याने, दोन्ही रेल्वे स्थानकांपासून सुटलेल्या बसेस डोंबिवली शहरातून नेण्यात आल्या. परिणामी, या प्रवासास पाऊण तास लागत होता. त्याचाही फटका प्रवाशांना बसला.
पुढच्या महिन्यात पुन्हा ब्लॉक-
एकच गर्डर टाकण्याचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याने, दुसऱ्या गर्डरसाठी ९ जुलैला पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. तो किती काळाचा असेल, ते रेल्वेने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान नाल्याच्या कामासाठी चार तास होणारा ट्रॅफिक ब्लॉक पावसामुळे रेल्वेने रद्द केला.
तलाव क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरी
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केला असतानाच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
पहिल्याच पावसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पातळी नोंदविण्यात येत असल्याने, महापालिकेलाही दिलासा मिळाला असून, पुढील तीन महिने पावसाचा वेग असाच कायम राहिला, तर मुंबईकराचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.
तलावपातळी (मीटर्स)पाऊस (मिमी)-
मोडक सागर१५१.९४२८१
तानसा१२२.९३३४०.४०
विहार७५.५२८८
तुलसी१३४.०१७५
अप्पर वैतरणा५९३.५७१६०
भातसा११३.२३१८४
मध्य वैतरणा२६९.७४२१८.३०