रेल्वेचा मेगाब्लॉक; २० ऑक्टोंबरपर्यंत शनिवारी, रविवारी इंटरसिटी एक्सप्रेस बंद
By appasaheb.patil | Published: September 6, 2019 01:08 PM2019-09-06T13:08:34+5:302019-09-06T13:10:49+5:30
दौंड ते सोलापूर दरम्यान हाती घेतले ट्रकचे काम; इतर गाड्यांच्या मार्गात केला बदल
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे़ दरम्यान, ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूरदरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना सुरक्षिततेशी संबंधित देखरेख करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकच्या कामासाठी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे ही गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी तर गाडी क्रमांक ११००१/०२ साईनगर-पंढरपूर-साईनगर एक्सप्रेस ही गाडी मंगळवार, गुरूवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय गाडी क्रमांक १७०१३ पुणे-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी ७, १४, २१, २८ सप्टेंबर व ५, १२, १९ आॅक्टोबर या कालावधीत कुर्डूवाडी-पुणे स्थानकादरम्यान धावणार नाही़ मात्र कुर्डूवाडी स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या...
- प्रत्येक शनिवार व रविवारी गाडी क्रमांक ७१४१४ डेमू सोलापूर ते कुर्डूवाडी स्थानकापर्यंत धावणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ कुर्डूवाडी ते सोलापूर ही गाडी आपल्या निर्धारित वेळेवर कुर्डूवाडी स्थानकावरून सुटणार आहे़ दरम्यान, गाडी क्रमांक ७१४१४ कुर्डूवाडी ते भिगवण स्थानकादरम्यान प्रत्येक शनिवार व रविवारी धावणार नाही़
- गाडी क्रमांक ७१४१५ डेमू पुणे ते भिगवण स्थानकापर्यंत धावणार आहे़. गाडी क्रमांक ७१४१४ भिगवण ते पुणे आपल्या निर्धारित वेळेवर भिगवण स्थानकावरून सुटणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ भिगवण ते कुर्डूवाडी स्थानकावरून धावणार नाही़
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील काही दिवसांपूर्वी दुहेरीकरणाचे काम झाले आहे़ या कामानंतर आता ट्रॅकच्या कामासाठी रेल्वेने दौंड ते सोलापूर विभागात ब्लॉक घेतला आहे़ काही गाड्या आठवड्यातून दोन दिवस तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे़ या बदलाची माहिती घेऊनच प्रवाशांनी प्रवास करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे़
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर विभाग