महामेगाब्लॉकने झाले प्रवाशांचे मेगाहाल
By admin | Published: September 19, 2016 05:15 AM2016-09-19T05:15:33+5:302016-09-19T05:15:33+5:30
दिवा स्थानकात जलद मार्गावरील लोकल गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रविवारी मध्य रेल्वेने दहा तासांचा महामेगाब्लॉक घेतला
ठाणे/ डोंबिवली : दिवा स्थानकात जलद मार्गावरील लोकल गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रविवारी मध्य रेल्वेने दहा तासांचा महामेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे ठाकुर्ली ते कळवा या मार्गावरील धीम्या मार्गावरील प्रवासी ठिकठिकाणी ताटकळले. असाच त्रास आणखी तीन वेळा तोही महिनाभरातच होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर वर्षअखेरीस दिव्यात जलद गाड्या थांबू शकतील.
मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बहुतांश स्थानकांत रेल्वे प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. ठाणे ते कल्याणदरम्यान रविवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहा असा तब्बल दहा तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला. जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी दोन्ही धीमे मार्ग आणि दोन्ही जलद मार्ग वळवणे, त्यासाठी नवे क्रॉसिंग तयार करणे यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला.
रविवारी आधीच फेऱ्या कमी असताना या महामेगाब्लॉकमुळे ६० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वीसपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने काही विशेष
बस या मार्गावर सोडण्यात आल्या. (प्रतिनिधी)
>मध्य रेल्वेने आॅक्टोबर अखेरपर्यंत चार महामेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १० तासांचा पहिला महामेगाब्लॉक रविवारी पार पडला. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये विशेष बदल जरी जाणवले नाहीत, तरी तांत्रिक कामे रेल्वेच्या अभियंत्यांनी केली. त्यात सिग्नल, रूळांचे मार्ग बदलणे, वेल्डिंग, कटिंग, केबल टाकणे, ओव्हरहेड वायरचे काम अशा तांत्रिक बाबींवर भर देण्यात आला.