मेघवाडीत पोलिसांची मुक्ताफळे
By admin | Published: July 22, 2016 03:26 AM2016-07-22T03:26:14+5:302016-07-22T03:26:14+5:30
जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरामध्ये लाइट नसल्याने आम्ही पेट्रोलिंग करू शकत नाही.
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरामध्ये लाइट नसल्याने आम्ही पेट्रोलिंग करू शकत नाही. त्यामुळे घरफोड्या होतात, त्यात पोलिसांची काय चूक? असे आश्चर्यकारक वक्तव्य मेघवाडी पोलिसांनी एका बैठकीच्या वेळी स्थानिकांसमोर केले. त्यामुळे स्थानिकांच्या जखमेवर फुंकर मारण्याऐवजी पोलिसांनी त्यावर मीठ चोळल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१६ जुलैच्या रात्री मेघवाडीत सात घरफोड्या झाल्या. त्यामुळे मेघवाडीतील संतप्त स्थानिकांनी पोलीस ठाण्यावर रविवारी मोर्चा काढला. या मोर्चावेळी मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी या प्रकरणी स्थानिकांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार, १८ जुलै रोजी शामनगर परिसरात आयोजित बैठकीला मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील आणि त्यांच्या तीन-चार सहकाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच उपस्थित राहिले नाही.
चोरी झालेल्या सर्व तक्रारदारांच्या दु:खात मी सहभागी आहे. जोगेश्वरीतील बहुतांश चाळीत वीज नसते. त्यामुळे रात्री कोणताही पोलीस अधिकारी गस्त घालण्यासाठी गल्लीत येऊ शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेतून पुढाकार घेत, काही लोकांनी रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी या वेळी स्थानिकांना केल्याची माहिती, समाजसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
जोगेश्वरीमध्ये चोरीचे आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कारण मेघवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी चाळीशी गाठली आहे. त्यामुळे ते चोरांचा पाठलाग करू शकत नाही, असाही मुद्दा या वेळी पोलिसांनी मांडल्याचे घोसाळकर यांनी
सांगितले.
कोणीही पोलीस कर्मचारी जोगेश्वरीमध्ये बदली करून घेण्यास तयार होत नाही. नागरिकांनी पोलिसांना समजून घ्यावे. वर्दीच्या आत एक माणूस असतो. घरफोडीच्या घटनेच्या तपासाबद्दल आता समर्पक उत्तर देता येणार नाही. याबाबत वरिष्ठच बोलू शकतील, असे म्हणत पोलिसांनी आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
>दवे कम्पाउंडमध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.
गणेश मैदान, श्याम तलावाच्या मागील रस्त्यावर अश्लील प्रकार चालतात.
कोकण नगर आणि करकरे उद्यानाच्या मागील रस्त्यावर अश्लील शेरेबाजी सुरू असते; त्यामुळे महिलांना येथून जाताना अडचणी येतात.
लाल बहादूर चाळ परिसरात मद्यपींचा वावर अधिक असतो.
शिवटेकडी आणि सर्वोदयनगर परिसरात खुलेआम अमलीपदार्थांची विक्री होते.
>तक्रारदारांना धमकी
मेघवाडी परिसरात अमलीपदार्थांची खुलेआमपणे विक्री केली जाते. याची स्थानिकांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र जी व्यक्ती तक्रार करते; त्याची माहितीच ड्रग्स पेडर्सला मिळते. परिणामी, संबंधितांकडून तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.