नवविवाहितेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास ‘मेहर’ची रक्कम सुपूर्द !
By admin | Published: May 8, 2016 04:50 PM2016-05-08T16:50:55+5:302016-05-08T16:50:55+5:30
लातुरात एका नवविवाहितेने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मेहरची रक्कम देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 8- मुस्लिम समाजात नववधूला वराकडून देण्यात येणाऱ्या मेहरच्या रक्कमेवर वधूचा हक्क असतो. या मेहरची रक्कम बहुतांश वधू मस्जिद, मदरसा किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला देतात अथवा स्वत:साठी खर्च करतात. मात्र लातुरात एका नवविवाहितेने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मेहरची रक्कम देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
लातुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांची मुलगी सानेहा हिचा विवाह इंडिया नगर येथील असद हबीबसाब शेख यांच्याशी देवणी येथे झालेल्या इज्तेमामध्ये झाला. या लग्नसोहळ्यात वर असदकडून वधू सानेहा हिस महेर म्हणून ५ हजार ५१ रुपये देण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून महेरची रक्कम एखाद्या गरीब, होतकरु कुटुंबाला देण्याबाबत सानेहाने आपल्या वडिलासह पतिसोबत चर्चा केली. मात्र तिला एक घटना आठवली ती म्हणजे लातूर तालुक्यातील भीसे वाघोली येथील हुंड्याच्या कारणावरुन आत्महत्या केलेल्या मोहिनी भिसेची़ हुंड्याच्या कारणासाठी ज्या मोहिनीला आपले जिव संपवावे लागले. तिच्या कुटुंबियाला ही महेरची रक्कम देण्याची इच्छा सानेहाने व्यक्त केल्यानंतर, पती असद हबीबसाब शेख, वडिल मोहसीन खान यांनी क्षणाचाही विलंब न लावता यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांनी या रकमेत ५ हजारांची भर घालून आपल्या घरी बोलवून मोहिनीची आई कांताबाई, वडिल पांडुरंग भिसे यांच्याकडे रविवारी एकूण १० हजार ५१ रुपये सुपूर्द केले आहे. या माध्यमातून सानेहाने समाजातील अन्य मुलींसमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे.