मेहता, मोपलवारांवरून गदारोळ;मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:53 AM2017-08-03T00:53:03+5:302017-08-03T00:53:06+5:30
मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांतील कथित घोटाळ्यांवरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि एका आॅडिओ सीडी प्रकरणावरून राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांतील कथित घोटाळ्यांवरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि एका आॅडिओ सीडी प्रकरणावरून राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याच्या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज प्रचंड गदारोळ केला. तर या प्रकरणी एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रचंड गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. विरोधकांनी वेलमध्ये बसून जोरदार घोषणाबाजी केली. विठ्ठल नामाचा गजर केला. सरकारच्या उत्तराने विरोधकांचे अजूनही समाधान झालेले नसून उद्या ते पुन्हा सरकारची कोंडी करणार का, याबाबत उत्सुकता आहे. मेहतांवरील आरोपांसंदर्भात कालच चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आज त्यांनी या आरोपांबाबत काहीही भाष्य केले नाही.
विधानसभेचे कामकाज आज गोंधळानेच सुरू झाले. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मेहता आणि मोपलवार प्रकरणावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ‘त्या’ सीडीत कोट्यवधी रुपये मंत्रालयात देण्याचा उल्लेख आहे. मोपलवार हे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रॉजेक्टचे प्रमुख आहेत. त्यामुळे हा सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
विखे-पाटील यांनी मेहतांवरील आरोपांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी केली. एकनाथ खडसेंवर आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला, मग मेहतांना वेगळा न्याय कशासाठी? असा सवाल वळसे-पाटील यांनी केला. मोपलवार प्रकरणी कारवाई होत नाही, तोवर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्यानंतर ‘सभागृहात आमचा आवाज दाबला जात असल्याचे विखे-पाटील म्हणाले आणि सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. मोपलवार यांच्या सीडीतील संभाषणाचा समृद्धी महामार्गाशी
संबंध आढळल्यास त्यांना समृद्धी
महामार्ग प्रकल्प अधिकारी पदावरून हटविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिले. मोपलवार यांना हटविण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.
मोपलवारांच्या सीडीला
अनिल गोटेंचे बळ
भाजपाचे सदस्य अनिल गोटे यांनी मोपलवार यांच्याबद्दल आपल्याला धक्कादायक माहिती दिली आहे, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी सभागृहात केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्टची जबाबदारी असलेल्या अधिकाºयाविरुद्ध भाजपा आमदाराने कुमक पुरविल्याचे स्पष्ट झाले. मोपलवार यांच्याशी संबंधित सीडीचा समृद्धी महामार्गाशी काहीही संबंध नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मेहतांचे नवे भूखंड
प्रकरण : विखेंचा आरोप
ताडदेवच्या एसआरएवरून आरोपांच्या पिंजºयात असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर घाटकोपरमधील एक भूखंड नियम धाब्यावर बसवून बिल्डरला दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. पंतनगर; घाटकोपर येथील १८ हजार ९०२ चौरस मीटरचा भूखंड १९९९मध्ये निर्मल होल्डिंग प्रा.लि.ला पुनर्विकासासाठी दिलेला होता. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने म्हाडाने तो २००६मध्ये परत घेतला; परंतु मेहता यांनी तोच भूखंड सर्व नियम धाब्यावर बसवून हा भूखंड पुन्हा एकदा त्याच विकासकाला दिल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. त्यावरून सभागृहातील गोंधळ अधिकच वाढला.
सत्यासत्यता पडताळलेली नाही
मोपलवार यांच्या संदर्भात एका चॅनेलने काल एक सीडी दाखविली त्या सीडीची सत्यासत्यता तपासून पाहिलेली नसल्याचे त्या चॅनेलनेच म्हटले आहे. आरोपांबाबत आगा-पिछा काहीही नाही. तरीही मोपलवार यांच्याशी कथित संबंध असलेल्या त्या सीडीतील आवाजाबाबत फॉरेन्सिक तपासणी सत्यासत्यता पडताळली जाईल. चौकशी एक महिन्यात पूर्ण करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांकडे
मेहता यांची तक्रार
प्रकाश मेहता यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांचा एक कथित खुलासा आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मेहता यांच्यावरील आरोपांमागे पक्षातीलच काही असंतुष्ट लोक असल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, आपण वा आपल्या कार्यालयाने कोणताही खुलासा केलेला नाही, असे मेहता यांनी स्पष्ट केले. आपली प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून तसे करणाºयाविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मेहता यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली.
तेव्हा तुम्हाला झोप कशी आली? : मुख्यमंत्री
सरकारमध्ये काय चाललेय? मंत्रालयात काही कोटी रुपये पोहोचवायचे असल्याचे सीडीमध्ये एक आयएएस अधिकारी सांगतोय, कालपासून चॅनेलवर हे दाखवताहेत. हा सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे.
त्या अधिकाºयाला कालच बोलावून जाब का विचारला नाही, सरकारची प्रतिमा डागाळताना तुम्हाला काल झोप तरी कशी आली? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना केला.
‘आमचा कारभार पारदर्शकच आहे. मोपलवार यांच्या संबंधी जे आरोप होत आहेत ती प्रकरणे तुमच्या सत्ताकाळातील आहेत, तेव्हा तुम्ही काहीच का केले नाही, तुम्हाला कशी झोप येत होती, असा प्रतिहल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
या आॅडिओ क्लिप्स बनावट असून त्या आवाजाचे संमिश्रण करून लबाडीने तयार केल्या गेल्या आहेत. कॉल डेटा रेकॉर्ड बेकायदा प्राप्त करण्यासारखे तंत्रशास्त्रीय गुन्हे केल्याची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने या क्लिप्स समाजमाध्यमांत व्हायरल केल्या. गुन्हेगारी टोळ््यांच्या मदतीने माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात ही व्यक्ती सध्या जामिनावर सुटलेली आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईलच.
- राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी.