मेहतांचे कुटुंबही आता आरोपांच्या घे-यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:41 AM2017-08-05T01:41:00+5:302017-08-05T01:41:03+5:30
ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडच्या एसआरए योजनेवरून वादाच्या भोव-यात सापडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या कुटुंबीयांवरही आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घोटाळ्यांचे आरोप केले.
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडच्या एसआरए योजनेवरून वादाच्या भोव-यात सापडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या कुटुंबीयांवरही आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घोटाळ्यांचे आरोप केले.
गृहनिर्माणमंत्री संचालक राहिलेल्या श्री साईनिधी प्रा.लि. या कंपनीने या भूखंडावर एसआरएअंतर्गत घाटकोपरमध्ये लक्ष्मीभुवन आणि गोपालभुवन या जुन्याच चाळींच्या नावाने, दोन नव्या इमारती उभ्या आहेत. या जागेवरील मूळ भाडेकरूंना अजून घरे मिळालेली नाहीत. मात्र, भाडेकरूंच्या यादीत गृहनिर्माण मंत्र्यांचा मुलगा हर्ष प्रकाश मेहता आणि इतर नातेवाईकांना बोगस भाडेकरू दाखवून त्यांना नव्या इमारतीत सदनिका देण्यात आल्या आहेत. भाडेकरूंच्या यादीत गृहनिर्माणमंत्र्यांच्या मुलाचे नाव आहे.
गृहनिर्माणमंत्री पूर्वी या कंपनीचे संचालक होते. आता त्यांचे अगदी घनिष्ट मित्र मुकेश दोशी हे आता विद्यमान संचालक आहेत. मुकेश दोशी यांची गृहनिर्माणमंत्र्यांशी किती जवळीक आहे, ते पाहायचे असेल तर विधानभवनाच्या प्रवेशद्वावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले पाहिजे. टीव्ही मीडियावर गृहनिर्माणमंत्र्यांचे जे फाइल फुटेज आहे, त्यात मुकेश दोशी मंत्र्यांसोबत विधानभवनात येताना दिसतात, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
फ्लॅट क्र. ४०३ , सम्यक दर्शन, किरोळ, घाटकोपर हा फ्लॅट प्रकाश मेहतांच्या पत्नी किशोरी मेहता
यांच्या नावे आहे. याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट क्र. ६०१मध्ये या जमिनीचे व बिल्डिंगचे मालक मनीष प्रवीणचंद्र शाह राहतात.
त्यांच्याशी गृहनिर्माणमंत्र्यांचा वाद आहे. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार करून गृहनिर्माणमंत्र्यांनी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सागर पाटील यांच्यामार्फत या बिल्डिंगचे बिल्डर आणि सर्व सदनिकाधारकांवर ११ मार्च २०१६ पंतनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला.
यामध्ये एक सदनिकाधारक गृहनिर्माणमंत्र्यांची पत्नीही होती. या कारवाईतून त्यांना वाचविण्यासाठी गृहनिर्माणमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव आणून पत्नीच्या नावात किशोरी मेहता ऐवजी किशोर मेहता, असे बदलून घेतले, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.