कोमलकर व नाईकची किडणी जुळली !
By admin | Published: December 18, 2015 02:19 AM2015-12-18T02:19:29+5:302015-12-18T02:19:29+5:30
देवेंद्र सिरसाटला बुधवारपर्यंत कोठडी.
अकोला: किडनी देणारे देवानंद कोमलकर आणि किडणी घेणारे नंदुरबारचे सुधाकर नाईक यांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून यामध्ये दोघांच्या किडणी जुळल्या आहेत. किडनी तस्करी प्रकरणामध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. खदान पोलिसांनी नंदुरबार येथून सुधाकर नाईक याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची व देवानंद कोमलकरची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. अहवालानुसार देवानंदच्या किडनीचे सुधाकर नाईक याच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामध्ये गुरुवारी दुपारी खदान पोलिसांनी आरोपी देवेंद्र सिरसाट याला अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांना त्याच्या घराची झडती घ्यायची आहे. त्याने किडनीदात्यांना कोणकोणत्या इस्पितळामध्ये नेले होते, याची माहिती घ्यायची असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयानेही पोलिसांची मागणी मान्य करून देवेंद्र सिरसाटला २३ डिसेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यातील दुसरा आरोपी विनोद पवार हा खदान पोलिसांच्या कोठडीतच आहे. पवार व सिरसाट यांची समोरासमोर चौकशी करुन पोलीस या प्रकरणातील आणखी माहिती उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
*आरोपीला नंदुरबारला नेणार
खदान पोलीस आरोपी देवेंद्र सिरसाट याला घेऊन औरंगाबादसह नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरला जाणार आहेत. या ठिकाणी काही चौकशी करण्यात येईल. त्याने या ठिकाणी आणखी काही व्यक्तींना किडनी देण्यासाठी बाध्य केले का, याचाही तपास पोलीस करणार आहेत.