गडबडीत मोटरमन ब्रेक लावायचे विसरला आणि 'तो' अपघात घडला
By admin | Published: July 24, 2015 08:10 PM2015-07-24T20:10:40+5:302015-07-24T20:11:46+5:30
फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आलेल्या ५० पानी अहवालात मोटरमन तिवारींना या अपघातासाठी पूर्णपणे दोषी ठरवण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या या अपघातात चर्चगेट स्थानकात आलेली लोकलची प्लॅटफॉर्मला धडकली व लोकलचे काही डबे थेट प्लॅटफॉर्मवरच चढले. या घटनेत मोटरमनसह ५ जण जखमी झाले होते. 'ही गाडी जेव्हा चर्चगेट स्थानकात येत होती तेव्हा शेजारच्या प्लॅटफॉर्मवर विरारला जाणारी गाडी उभी होती. त्यामुळे ती गाडी पकडून घरी जाण्याच्या गडबडीत असलेल्या मोटरमन तिवारी यांनी घाईघाईत गाडीचे ब्रेकट लावले नाहीत' असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 'तसेच गाडी जेव्हा स्थानकात येत होती तेव्हा तिवारींनी आपले लोकल ड्रायव्हिंगचे सामान तसेच सोडून स्वत:चे सामान आवरण्यास सुरूवात केली. त्यामुळे हा अपघात तिवारी यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे' असा ठपका चौकशी अहवालातून तिवारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मात्र याप्रकरणी दोषी ठरलेल्या किवारींवर यापुढे काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.