मेळघाट अंधारात
By admin | Published: January 23, 2015 01:54 AM2015-01-23T01:54:09+5:302015-01-23T01:54:09+5:30
महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़
मध्य प्रदेशची कारवाई : ४५ आदिवासी गावांची वीज कापली
नरेंद्र जावरे
ल्ल चिखलदरा (जि़ अमरावती)
महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी ही सर्व गावे अंधारात बुडाली आहेत.
अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यांना मध्य प्रदेशातून, तर मुक्तागिरी व परिसरात महाराष्ट्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. दोन्ही राज्यांतून समन्वयाने हा पुरवठा सुरू आहे. परंतु महावितरणने ४५ लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने चिखलदरा तालुक्यातील जारिदा सबस्टेशनचा वीजपुरवठा मध्य प्रदेशातून खंडित केला आहे. त्यामुळे काटकुंभ - चुरणी-जारिदा परिसरातील ४५ गावांतील आदिवासींवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर देयके भरण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अचलपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले़
वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना, दळण यंत्र बंद आहेत. तर दुसरीकडे शेतीचे ओलीत थांबले आहे. पुरवठा बंद राहिल्यास पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आमचा दोष काय?
आम्ही आमची वीज बिले अदा केली आहेत. आमचा दोष काय़? महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आदिवासी शेतकऱ्यांना बसत आहे. झालेल्या पिकांची नुकसानभरपाई महावितरणने द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे पीयूष मालवीय, राहुल येवले, अमोल बोरेकार, गौरव काळे आदींनी दिला आहे.
थकबाकी
२२ जानेवारीपर्यंत ४४ लाख ८८ हजार रुपये भरण्याचा अल्टीमेटम महावितरणला देण्यात आला होता. तरी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही़ परिणामी वीजपुरवठा खंडित केल्याचे भैसदेही येथील शाखा अभियंता अरविंद डहटिया यांनी सांगितले.