मेळघाटात व्याघ्र गणना अडचणीत, वनकर्मचारी संपाचा फटका; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 04:49 PM2018-01-31T16:49:34+5:302018-01-31T16:51:20+5:30
देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यजीवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु...
अमरावती : देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून राबविण्यात आली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जीपीएस यंत्रणेअभावी व्याघ्र गणना अडचणीत आली. त्यामुळे आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना नव्याने होणार असली तरी यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यजीवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील वनकर्मचा-यांनी वेतनवाढीचा मुद्दा आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकून जीपीएस मोबाईल यंत्र हाताळण्यास नकार दिला. त्यानंतर १९ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले. यात अकोट वन्यजीव विभागातील तीन वनकर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले, हे निलंबन मागे घेण्यासाठी २४ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ केला ते आजतागायत कायम आहे. दुसरीकडे वनपाल, वनरक्षकांनी जीपीएस हाताळण्यास नकार दिल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वन्यजीव प्रगणना होऊ शकली नाही. वनकर्मचा-यांच्या आंदोलनाचा परिणाम वन्यजीव प्रगणनेवर झाला असून मेळघाटात नेमकी वाघांची संख्या किती? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. सन २०१३ नंतर तब्बल चार वर्षांनी झालेली वन्यजीव प्रगणना मेळघाटात सुरळीत राबविता आली नाही. त्यामुळे वन्यजीव प्रगणनेचा अहवाल राज्याच्या प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत सादर करावयाचा असल्याने तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिका-यांना सादर होऊ शकला नाही.
पेंच, ताडोब्यात झाली व्याघ्र गणना -
देशभरातील ५२ व्याघ्र प्रकल्पांशिवाय प्रादेशिक वनविभाग, वनविकास मंडळांच्या जंगलातसुद्धा प्राणी प्रगणना राबविण्याचा निर्णय राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने घेतला होता. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प वगळता राज्यात पेंच, ताडोबा-अंधारी, सह्याद्री, बोर, नवेगाव- नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांत कशीबसी आटोपली. परंतु कर्मचारी वेतनवाढ आणि जीपीएसच्या मुद्दावरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव प्रगणना पूर्ण झालीच नाही.
काय आहे जीपीएस यंत्र?
जीपीएस यंत्राद्वारे जंगलातील अचूक लोकेशन वनाधिका-यांना बसल्या जागी मिळविता येते. वनकर्मचारी नेमके कोठे, कसे कर्तव्य बजातात, हे सुद्धा क्षणात कळते. वन्यजीवांचे अधिवासाची माहिती रेखांशवरून सिद्ध करता येते. सर्वेक्षण आणि कर्तव्यात चूक असू नये, यासाठी जीपीएस महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
‘‘वनकर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम व्याघ्र गणनेवर झाला आहे. एनटीसीएच्या निर्देशानुसार पुन्हा नव्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना केली जाईल.
- विशाल माळी,
उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल