मेळघाटच्या ‘ग्रास मॅन’ने ३० व्याघ्र प्रकल्पांत फुलविले कुरण; ‘गवत असेल तरच वाघ वाचेल’ची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:05 AM2021-07-29T09:05:09+5:302021-07-29T09:06:13+5:30
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन; चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे.
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : जंगल असेल तर वाघ दिसेल, वाघासाठी आवश्यक असलेले तृणभक्षी प्राणी आणि त्या प्राण्यांसाठी अति आवश्यक असलेले कुरण अशा या अन्नसाखळीला तयार करण्यासाठी चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक-दोन नव्हे, तर १२ राज्यांतील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पांत तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले आहे. त्यामुळे पर्यावरणासह व्याघ्र संवर्धनात मोठी मदत झाली आहे.
चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. कुरणामुळे जमिनीची धूप, तापमान थांबण्यासह पाण्याचा निचरा होऊन कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांना नैसर्गिकरीत्या आश्रयस्थान, तृणभक्षी प्राण्यांना आवडते खाद्य व वाघ-बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांना जंगलातच शिकार मिळत असल्याने शहरात जाऊन मानव-वन्यजीव संघर्ष थांबण्यास मदत झाली आहे. मुंगी ते हत्तीपर्यंत गवत अन्नसाखळीचा दुवा ठरले आहे.
तृणभक्षी प्राण्यांत गवताच्या आवडीनिवडी
मानवांमध्ये जेवणाच्या आवडीनिवडी आहेत, त्याप्रमाणे चितळ, गवा, सांबर, अशा विविध तृणभक्षी प्राण्यांच्याही आवडीनिवडी आहे. काहींना मुलायम व कडक गवत आवडते. त्यानुसार चितळाला मार्व्हल गवत हे रसगुल्लाप्रमाणे आवडते, तर गवा कुसळी व गोंधळी, सांबर गवत कमी व झाडांची पाने, फुले, फळे जास्त खातो. दूर्वा, पवन्या, रानतूर, रानमूग, रानसोयाबीन, बांबू, अशा विविध प्रजातींचे गवत आहेत.
या राज्यांत गवती कुरण
मध्यप्रदेश : कान्हा, सातपुडा, पन्ना, पेंच, बांधवगड. महाराष्ट्र : मेळघाट, सह्याद्री, पेंच, ताडोबा, नवेगाव, टिपेश्वर, नानज, भीमाशंकर, रहेकुरी. छत्तीसगड : अंचानकमार व इतर ४ अभयारण्यात. राजस्थान : रणथंबोर, मुकुंदराहिल्स. कर्नाटक : बंदीपूर नागरहोले काली भद्रा बीआरटी. तामिळनाडू : के एम टी आर, ओरिसा : सिंमलीपाल सातखोशिया. तेलंगणा : कवल अमराबाद. बिहार : वाल्मिकी टायगर रिझर्व. उत्तराखंड : जिमकार्बेट आदी १२ राज्यांपेक्षा अधिक ठिकाणी त्यांनी कुरण तयार केले आहेत.