खासदार चंद्रकांत खैरेंवर अखेर गुन्हा दाखल
By Admin | Published: November 3, 2015 04:08 AM2015-11-03T04:08:14+5:302015-11-03T04:08:14+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाजनगरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’ हिसका दाखविणे खा. चंद्रकांत खैरे
औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाजनगरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’ हिसका दाखविणे खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट यांना अखेर चांगलेच महागात पडले. सोमवारी या दोन्ही नेत्यांसह ३० ते ४० शिवसैनिकांविरुद्ध पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा नोंदविला. आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.
पोलिसांनी शिवसेना नेत्यांवर गुन्हा नोंदविताच महसूल अधिकारी - कर्मचारी संघटनेने खैरेंच्या कृतीविरोधात
उपसलेले आंदोलनाचे हत्यार म्यान केले. संप मागे घेऊन सोमवारी दुपारनंतर महसूल अधिकारी, कर्मचारी कामावर हजर झाले.
न्यायालयाच्या आदेशानुसार २८ आॅक्टोबरला पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने सहा धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. चार मंदिरांचे अतिक्रमण हटविल्यानंतर संत शिरोमणी नरहरी मंदिराचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असतानाच खा. खैरे, आ. शिरसाट दुपारी तीन वाजेच्या सुमारास सेनेच्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. शिवसैनिकांनी अतिक्रमण हटाव पथकाला रोखले.
तहसीलदारांना शिवीगाळ, धक्काबुक्की
खा. खैरे यांनी तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे वाहन अडविले आणि त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले. खैरे यांनी कारवाईबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचारी संतापले. शनिवारी निवासी जिल्हाधिकारी आर. बी. राजपूत तसेच उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तलाठी संघ आदींसह महसूल कर्मचाऱ्यांनी खैरेंविरोधात पोलिसांत तक्रार दिली. मात्र, गुन्हा दाखल न केल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी ३१ आॅक्टोबरपासून संप सुरू केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. मंगळवारपासून संपूर्ण मराठवाडाभर आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय झाला. (प्रतिनिधी)
फरक पडणार नाही... हिंदुत्व रक्षण ही सेनेची भूमिका आहे. जेव्हा-जेव्हा हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले, तेव्हा सेनाच रस्त्यावर उतरली आहे. मी केलेले वक्तव्य मुजोर प्रशासना-विरोधात होते. त्यावर मी ठाम आहे. मी कुठल्याही कारवाईला घाबरणाऱ्यांपैकी नाही. असे अनेक गुन्हे माझ्यावर आहेत. मला काही फरक पडणार नाही. - खा. चंद्रकांत खैरे