चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होणार?
By admin | Published: February 5, 2016 04:00 AM2016-02-05T04:00:16+5:302016-02-05T04:00:16+5:30
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद धोक्यात
अजित मांडके, ठाणे
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्य सरकारने त्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
आधीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापुढील अडचणी वाढल्या असतानाच, ठाण्यातही त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांवर आता पद गमावण्याची टांगती तलवार आहे.
बीपीएमसी अॅक्टमधील सेक्शन १३ अॅक्टनुसार निवडून आलेल्या नगरसेवकाने कामात कुचराई केली, गैरकृत्य वा अशोभनीय वर्तन केले, तर अशा नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका तीन चतुर्थांश मतांनी मंजूर करून, राज्य सरकारला शिफारस करू शकते. ठराव मंजूर झाल्याच्या तारखेपासून नगरसेवकपद रद्द होते.
या कलमानुसार, नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन राज्य सरकारही कारणे दाखवा नोटीस बजावू शकते. प्रस्तुत प्रकरणात चारही नगरसेवकांवर आरोपपत्र दाखल झाले असून, त्यामध्ये त्यांनी परमार यांची छळवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने या नगरसेवकांना तुमचे नगरसेवकपद रद्द का करू नये, अशा नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. अल्पावधीत या नोटिसा त्यांच्या हाती पडतील. त्यावर त्यांना आपले म्हणणे सरकारपुढे मांडता येईल व त्यानंतर सरकार नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेईल. परमार हत्येप्रकरही चारही नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली. चौघांवर पोलिसांनी न्यायालयात ३०४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वारंवार जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना अद्यापही त्यांच्यातील एकालाही जामीन मिळालेला नाही. या चारही नगरसेवकांचे पद रद्द झाले, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मोठा धक्का असेल. कारण वर्षभरानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.