कौशल्य विकासाबाबत १५ संस्थांशी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:26 AM2018-02-19T04:26:32+5:302018-02-19T04:26:40+5:30
मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. करार फक्त कागदावरच राहणार नसून त्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करून अंमलबजावणी करू, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
स्वीडिश चेंबर आॅफ कॉमर्स एससीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांच्यातील करारामुळे ११० गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया, शेती क्षेत्र, पर्यटन, बँकिंग, ऊर्जा इत्यादींमध्ये प्रशिक्षण देणाºया कार्यक्रमाचा कालावधी ३ वर्षांचा असून यामुळे १८०० गरजूंना लाभ होणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीस आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल हब लि. क. च्या माध्यमातून संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात प्रशिक्षण देणार असून एक वर्षाच्या कालावधीत त्याचा लाभ तरुणांना होणार आहे. अंजुमन-इस्लाम शिक्षण संस्था संगणक क्षेत्रात प्रशिक्षण देऊन ५ वर्षात ६००० गरजूंना रोजगार देणार आहे. महिंद्रा सुटेन कंपनीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात तब्बल २४०० जणांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देणार आहे. एमिटी युनिव्हर्सिटी ग्रुप आयटी, पर्यटन, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात प्रशिक्षण देऊन १०,००० रोजगार उपलब्ध करणार आहे. मोझेक नेटवर्क रिटेल, लॉजीस्टिक, ब्युटी अँड वेलनेस आदी क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून ५० हजार रोजगार उपलब्ध करणार तसेच यशस्वी अकॅडमी फार स्किलच्या माध्यमातून आॅटोमोबाईल, रिटेल व बीएफएफआय क्षेत्रात ३ वर्षांसाठी प्रशिक्षण देणार असून ५ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत. आतापर्यंत उद्योगांशी १०५ सामंजस्य करार झाले असून त्याचा १ लाख ८९ हजार ८४८ प्रशिक्षणार्थींना फायदा झाला आहे. १३,५९० तरुण प्रशिक्षण घेत आहेत व ६४,१०९ जणांना रोजगार मिळाला आहे.