महापौर बंगल्यात शिवसेना प्रमुखांचे स्मारक
By admin | Published: February 27, 2017 07:27 PM2017-02-27T19:27:55+5:302017-02-27T19:27:55+5:30
समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या दादर पश्चिम येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज
मुंबई, दि. 27 - समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या दादर पश्चिम येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज अखेर महापालिकेच्या मावळत्या महासभेत मंजूर करण्यात आला. सत्ता स्थापनेचा निर्णय अधांतरी असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. मात्र यामुळे आतापर्यंत या बंगल्याचे यजमान असलेल्या महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळ्यातील राणीच्या बागेत हलविण्यात येण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रमुखांच्या भव्य स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगलाच उत्तम जागा ठरेल, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार महापौर बंगल्याचा भूखंड बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे हा प्रस्ताव निवडणुकीच्या काळापर्यंत लांबणीवर पडला. मावळत्या सभागृहाची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी आज हा प्रस्ताव शिवसेनेने बहुमताने मंजूर करुन घेतला.
महापौर बंगला राणीच्या बागेत?
हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेतही मंजूर झाल्यामुळे आता महापौर बंगला स्मारक न्यासकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र यामुळे पुढच्या आठवड्यात निवडून येणाऱ्या नवनिर्वाचित महापौरांना शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे़ नव्या महापौरांचे शासकीय निवासस्थान म्हणून भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेतील बंगल्याची निवड करण्यात आली आहे.
राणीची बाग सोयीची
दादर येथील आकर्षक स्थळांपैकी एक असा महापौर बंगला परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षण ठरले आहे़ पुरातन वास्तू असलेल्या या बंगल्याला समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. साडेचार हजार चौ. फ़ुटांमध्ये असलेला हा आकर्षक बंगला म्हणजे महापौरपदाच्या शानमध्ये चारचाँदच़ तसेच मध्यवर्ती ठिकाणं असल्याने दादरमधील हा बंगला महापालिकेचे कार्यक्रम व बैठकांसाठीही सोयीचा ठरत असे़ ही जागा स्मारकासाठी दिल्यानंतर मध्यवर्ती ठिकाण व तक्रार घेऊन जाणाऱ्या मतदारांसाठी सोयीचे ठिकाण म्हणून भायखळा येथील राणीची बागच उत्तम ठरणार आहे.
असे आहे महापौरांचे नवीन निवासस्थान
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील नवीन बंगला सहा हजार चौरस फुटांचा आहे़ गेल्या दीड वर्षांपासून हा बंगला रिकामी असून नुकतीच त्याची डागडुजी करण्यात आली आहे़ त्यामुळे हा बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याचा विचार सुरु आहे़ मात्र याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही़