पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दी महोत्सवाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:17 AM2019-05-07T03:17:21+5:302019-05-07T03:18:08+5:30
शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
मुंबई : शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी, विनोद बुद्धी, संगीतातली वैविध्ये, हरहुन्नरीपणा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हा सोहळा त्यांचे शिष्य व संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, (संस्कृती मंत्रालय) आणि केंद्र सरकारच्या संयोजनाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, श्रीमती फैयाज, राजू हळदणकर, रवींद्र आवटी, नीलय वैद्य, सुरेश महाजन, सुरेश खरे आणि दीपक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याच्या नूपुर गाडगीळ यांनी राग भीमपलासीने केली. त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेख, दुर्मीळ फोटो, त्यांचे पत्र समाविष्ट असलेल्या ‘नक्षत्र वसंत’ स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. वसंतराव देशपांडे हे अतिशय बुद्धिमान, रसिले व नावीन्याचा शोध घेणारे होते, या शब्दांत संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांनी वर्णन केले. कार्यक्रमाची सांगता करताना संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांच्या जोगकंस, तराना व राग भैरवीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
वसंतरावांवर डॉक्युमेंट्री बनावी - चंद्रकांत लिमये
या वेळी पं. चंद्रकांत लिमये म्हणाले, कलागुणांना योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळाले तर त्यांना पुढे येण्यासाठी वेळ लागत नाही. याकरिता मी आजवर अनेक होतकरू कलाकारांना माझ्या संस्थेच्या रंगमंचावरून संधी दिली आहे व यापुढेही देण्याचा प्रयत्न करीत राहीन. डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आजवरचा संगीत प्रवास यावर डॉक्युमेंट्री बनविण्याचा मानस व्यक्त केला.
रसिक झाले मंत्रमुग्ध
यानंतर ‘वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पं. लिमये यांनी आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर केला. या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीते सादर केली. यात पं. चंद्रकांत लिमये यांचे शिष्य कैवल्य केजकर यांनी गायलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘सुरत पियाकी’ या नाट्यगीताने प्रेक्षकांची दाद मिळवली.