स्त्री-पुरुषांना समान हक्क मिळावेत- चेतन भगत
By Admin | Published: October 6, 2016 06:43 PM2016-10-06T18:43:32+5:302016-10-06T19:54:14+5:30
प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे. 'लोकमत'ने केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि.च्या सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि. झेलम चौबळ आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.
"कौटुंबिक हिंसाचाराविषयी संसदेत विधेयक मंजूर करताना डोळ्यांत अश्रू आले होते. आजही महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. मंदिर आणि मशिदींमध्ये महिलांना आजही प्रवेश नाकारला जात आहे. मात्र आज ही परिस्थिती काही प्रमाणात बदलत आहे. यामध्ये लोकमतने राबविलेल्या विविध उपक्रमांचा मोठा वाटा आहे. लोकमत सखी मंच यांचा त्यात मोठा वाटा आहे. 40 महिलांपासून सुरू झालेला सखी मंच 3 लाख महिलांचा झाला असून, आज आपण महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे", असं मत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मांडलं आहे.
त्यानंतर मंचावर आलेले चेतन भगत म्हणाले, "अनेक पुरुष नेहमी मुलीकडे पाहून हायफाय आहे, असं म्हणतात. मात्र लग्न करायला त्यांना घरगुती मुलगीच लागते. अनेक महिलांना घर सांभाळणे ही मुख्य जबाबदारी वाटते. तर अनेक महिलांना करियर, मात्र काहींना दोन्ही जबाबदा-या महत्त्वाच्या वाटतात. प्रत्येक स्त्रीनुसार तिची जबाबदारी बदलते. आपण महिलांना संधी देतो मात्र जेव्हा त्या काही साध्य करायला जातात तेव्हा आपल्याला त्यांच्याबाबत प्रश्न पडतो की त्या घरातील कामे करतील का ?, असा प्रश्न चेतन भगत यांनी उपस्थित केला आहे.
माझं लिखाण जरी खूप अनौपचारिक वाटत असले तरी त्यामागे एक विचार असतो. तो संदेश मला माझ्या लिखाणातून पोहोचवायचा असतो, असं प्रतिपादन चेतन भगत यांनी केलं आहे.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
चेतन भगत हे विशेष करून तरुण पिढीतील मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देश-विदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित तर ते आहेतच. फाईव्ह पॉइंट समवन, वन नाईट अॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, मेकिंग इंडिया ऑसम ही त्यांची काही फारच गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे बॉक्स ऑफिसवर हीट झालेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था आणि संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. या निमित्ताने चेतन यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरला आहे.