कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

By admin | Published: September 22, 2016 10:08 PM2016-09-22T22:08:18+5:302016-09-22T22:08:18+5:30

दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़

Men hanging from house-to-house! | कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

Next

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २२ : दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़ जीवन जगायचे कसे, लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे़ या संदर्भात पालकमंत्र्यांपुढे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला तर आमचे म्हणणे ऐकून न घेता दुर्लक्ष केल्याची कैफियत अटकेतील शेतकरी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली़ या वेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली़ दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकीपूर्वी बंद खोलीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली़

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नावरुन मंगळवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बंद खोलीत पार पडली़ त्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते़ बंद खोलीत बैठक झाल्याने त्यात काय चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नाही.

असे असले तरी या बैठकीत मंगळवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात आले़ या बैठकीनंतर नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत बैठक झाली़ या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते़

बैठकीत सुरुवातीस पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी पोलीस प्रशासन सीसीटीव्हीचे उपलब्ध असलेले फुटेज पाहून निर्णय घेतील़ दगडफेकीत ज्यांचा समावेश नाही, त्या व्यक्तींची नावे मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासन कार्यवाही करेल़ शेतकऱ्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत़ या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या जातील़ त्यानंतर निर्णय घेतला जाईल़ असे सांगून डाव्या कालव्याचे काम सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले़ २५ वर्ष होऊनदेखील काम मार्गी लागत नाही़ आमच्यावर संकट कोसळले असताना आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला़

पालकमंत्र्यांना युवक कॉँग्रेसचा घेराव
आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेराव घालण्यात आला़ राज्यात सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे़ शेतकऱ्यांना कांदा ५ पैसे दराने विकण्याची वेळ आलेली आहे़ असे असताना अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी डाव्या कालव्याने मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवर लाठीहल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात येऊनही काम मार्गी लागलेले नाही़ तातडीने डाव्या कालव्याचे काम पूर्ण करावे आणि आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, प्रभादेवी परदेशी, गायत्री जयस्वाल, योगिता पवार, बानू शिरसाठ, सतीश रवंदळे, डॉ़ कैलास सोनवणे, हरीश पाटील, मुबीन अन्सारी, अबुलास खान, रफीक शाह, योगेश विभुते, मसूद सरदार, महेश कालेवार, सरवर अन्सारी, राजू कर्पे, मोहसीन तांबोळी, नाजनीन शेख, शोएब अन्सारी, रिदवान अन्सारी आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Men hanging from house-to-house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.