सेनेच्या ‘डिड यू नो’ला मनसेचे ‘येस वुई नो’चे प्रत्युत्तर
By admin | Published: January 18, 2017 02:37 AM2017-01-18T02:37:44+5:302017-01-18T02:37:44+5:30
शिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर प्रदर्शित करत, तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
चेतन ननावरे,
मुंबई- शिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर प्रदर्शित करत, तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोस्टरविरोधात मनसेने ‘येस वुुई नो’ आशयाची पोस्टर सीरिज सोशल मीडियावर वायरल केली आहे. या पोस्टरमधून मनसेने सेनेच्या विकासकामांची खिल्ली उडवली आहे.
या पोस्टरबाबत सांगताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांत महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला मुंबईकरांना पायाभूत सुविधाही पुरवता आल्या नाहीत. तरीही ‘करून दाखवले’ आणि ‘डीड यू नो’ अशा पोस्टरमधून विकासकामांच्या बाता मारल्या जात आहेत. सेनेचा हा भंपकपणा उघड करण्याचे काम मनसेने केले आहे. यापुढेही महापालिका प्रशासनाच्या खोट्या दावांची पोलखोल मनसे करत राहील, असेही त्यांनी सांगितले. मनसेने वायरल केलेल्या पोस्टरमध्ये मुंबईतील खड्डे, महापालिका शाळा, बेस्ट दरवाढ, कचरा घोटाळा या विविध मुद्द्यांवरून सेनेचा समाचार घेतला आहे. त्यात मुंबईकरांचे १८२ कोटी रुपये खड्ड्यांत घालून, मुंबईकरांच्या नशिबी खड्डेच आल्याचे सांगण्यात आले आहे. खड्ड्यांसोबतच बेस्टच्या किमान भाड्यात केलेल्या वाढीवर मनसेने टीका केली आहे. २०१२ साली बेस्टचे किमान भाडे फक्त ३ रुपये होते. याउलट २०१७ मध्ये बेस्टचे किमान थेट ८ रुपयांवर पोहोचले आहे, याशिवाय बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन महापालिकेला जमले नसल्याचा आरोप मनसेने पोस्टरमधून केला आहे.
>‘शिवसेनेला सोशल मीडियातून उत्तर देणार’
शिवसेना, भाजपाची गेली २२ वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही मुंबईकरांना मूलभूत सुविधा देण्यात ते अपयशी ठरले आहेत. पालिकेत अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झाले. तरीही शिवसेनेने मुंबईभर ‘डिड यू नो’ची होर्डिंगबाजी सुरू केली आहे. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअॅप या माध्यमातून त्यांच्या या ‘डिड यू नो’ला मुंबई काँग्रेस चोख उत्तर देणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबई काँग्रेसच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून पालिकेतील सर्व घोटाळ्यांची माहिती देण्यात येणार आहे. ‘डिड यू नो’ रस्ते घोटाळा, खड्डे घोटाळा, रस्ते दुरुस्ती घोटाळा, टॅबलेट घोटाळा, नालेसफाई घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे निरुपम यांनी सांगितले.
>‘ऊठ मराठी माणसा
जागा हो’
आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान ‘उठ मराठी माणसा जागा हो’ असा संदेश टाकत, मनसेने पोस्टरच्या माध्यमातून मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रंगलेल्या पोस्टरयुद्धावरील मुद्दे लवकरच निवडणुकीच्या प्रचारात दिसतील, यात शंका नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, सपा, एमआयएम या राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. परिणामी या मुद्यावर
कोण कोणावर कसे प्रहार
करतो याकडे सर्वांचेच लक्ष
आहे.