पुरुष दिन विशेष - घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:27 AM2019-11-20T11:27:33+5:302019-11-20T11:27:54+5:30
घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं...एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं...!
पुणे : घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं...एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं... ही चंद्रशेखर गोखले यांनी रचलेली चारोळी म्हणजे सुखी संसाराचा जणू मूलमंत्रच! पुरुषप्रधान संस्कृती, पितृसत्ताक व्यवस्था आणि समाजातील मानसिकतेमध्ये हा मुलमंत्र रुजला आहे का, असा प्रश्न पडण्यासारखी सद्यस्थिती आजूबाजूला पाहायला मिळते. मात्र, दुसरीकडे अनेक कुटुंबांमध्ये पुरुष स्त्रियांच्या बरोबरीने घरकामापासून अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असल्याचे सकारात्मक चित्रही पहायला मिळत आहे. आपल्याकडेही ‘हाऊस हस्बंड’ ही संकल्पना हळूहळू रुजायला लागली आहे. ‘पुरुष बदलतोय’ हे समाजातील सकारात्मक चित्र दिलासा देणारे आहे.
पूर्वीपासूनच घरातील जबाबदारी स्त्रियांची आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची, असा अलिखित नियम भारतीय संस्कृतीमध्ये रुजला आहे. मुलींवर आणि मुलांवर लहानपणापासून तसेच संस्कारही केले जातात. त्यामुळेच एखादा पुरुष पत्नीला घरकामात मदत करत असेल तर घरातील दुस-या स्त्रीकडूनच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जातो, टोमणे मारले जातात. बरेचदा, पुरुषांनाही घरातील कामे करणे, जबाबदारी वाटून घेणे कमीपणाचे वाटते. मात्र, ‘हाताची पाचही बोटे सारखी नसतात’ या उक्तीप्रमाणेच प्रत्येक पुरुष एकाच प्रकारचा विचार करणारा नसतो. त्यामुळेच अनेक कुटुंबांमध्ये पुुरुषांनी ही परंपरा मोडीत काढत पत्नीच्या बरोबरीने जबाबदारी उचलायला सुरुवात केली आहे. भाजी खरेदी करणे, मुलांच्या शाळेत मिटिंगला उपस्थित राहणे, बाळाची शी-शू काढणे, स्वयंपाक, कपडे धुणे-भांडी घासणे ही कामे करणारे ‘आदर्श पुरुष’ समाजासाठी नवे आयकॉन ठरु पाहत आहेत.
-----------
समानतेचे संस्कार घरापासूनच व्हायला हवेत आणि ते उपदेशातून नव्हे, तर कृतीतून होतात. मला दोन्ही मुले आहेत. आम्ही तिघे मिळून पत्नीला घरकाकामात मदत करतो. आम्ही दोघेही नोकरी करतो. त्यामुळे मुलांना स्वत:ची कामे स्वत: करण्याची सवय लावली आहे. सकाळच्या धावपळीत आम्ही दोघांनी कामांचे समसमान वाटप करुन घेतले आहे. त्यामुळे कोणाच एकाची धावपळ होत नाही. दिवस सुखाने सुरु होतो आणि शांततेच संपतो.
- अभिजीत जोशी, डॉक्टर
-------------
माझी पत्नी मार्केटिंग मॅनेजर आहे, तर मी आयटीमध्ये. कामानिमित्त तिला सतत फिरतीवर रहावे लागते. दोघांचे आई-वडील नसल्याने आणि मुलगी लहान असल्याने घराची जबाबदारी कशी वाटून घ्यायची, यावर आम्ही बरीच चर्चा केली. मी आयटी क्षेत्रात असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला आहे. पत्नी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडते, तिला घरी यायला रात्री नऊ वाजतात. त्यामुळे मी घरी राहून काम करुन मुलीची आणि घराची जबाबदारीही पार पाडू शकतो. यामध्ये मला काहीही कमीपणा वाटत नाही.
- स्वप्नील शिंदे, कॉम्प्युटर इंजिनिअर
-----------
ंंआता काळ बदलला आहे. नवरा-बायको दोघेही नोकरीसाठी बाहेर जातात. ‘ती’ देखील माझ्याप्रमाणेच दमून येते. मग घरची जबाबदारी ‘ती’ने एकटीनेच का उचलायची? घर हे दोघांंचं आहे आणि ते एकमेकांनीच सांभाळून घेतलं पाहिजे. पण याची जाणीव खूप कमी पुरूषांना आहे. एकीकडे आपण स्त्री-पुरूष समानतेविषयी गप्पा मारतो. मग ही समानता घरापासून का सुरू करू नये. आम्ही काम वाटून घेतलेली आहेत आणि कोणी कुठली काम कधी करायची याचे दिवसही वाटून घेतले आहेत. मला घरातली काम करायला, मुलांना सांभाळायला कमीपणा कधीच वाटत नाही- आशिष सहस्त्रबुद्धधे, नोकरदार
---------------------------------------------------------
ज्यावेळी मी लग्नाचे स्थळ आल्यावर मुलीला भेटायला गेलो होतो. तेव्हा तिने मला घरातली जबाबदारी दोघांनी घ्यायची असे स्पष्टपणे सांगितले आणि मला तेचं जास्त भावले. कारण लग्नानंतर अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या आधीच संवादातून समजल्या तर संसार फुलण्यास अधिक मदत होते. मी तिला चालेल म्हटले आणि आमचे सूर जुळले. लग्नानंतर मी तिला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत आहेत. अगदी स्वयंपाक, घरातली आवराआवर, झाडून-पुसून काढणे अशी कामे करतो. यामुळे आमच्यातलं नातं अधिक परिपक्व झालं आहे- संकेत सपकाळ, अभियंता
--------------------------------------