अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ
By admin | Published: April 15, 2017 12:42 AM2017-04-15T00:42:27+5:302017-04-15T00:42:27+5:30
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा
उस्मानाबाद : जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने या अर्जात नमूद केले आहे़ ‘मी आत्महत्या करीत आहे’ असा संदेश मोबाइलवर पाठविल्याप्रकरणी या महिलेविरुद्धही गुरुवारी रात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या महिलेने गुरुवारी रात्री ‘मी आत्महत्या करीत आहे’ असा संदेश मोबाइलवर पाठवून धमकी दिल्याची तक्रार जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली़ या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला़ तर, या महिला कर्मचाऱ्याने देखील सानप यांच्याविरुद्ध शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़
मनोज सानप हे दीड-दोन महिन्यांपासून जाणून-बुजून मानसिक त्रास देत आहेत़ त्यांच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून, ती पोस्ट व्हॉटस्अॅपवरून भंडारे व सानप यांना केली होती, असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे़ सायंकाळी उशिरापर्यंत पोलीसांत यासंदर्भात नोंद झाली नव्हती़ (प्रतिनिधी)