व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:07 AM2018-12-23T07:07:02+5:302018-12-23T07:07:09+5:30
राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आरोग्याच्या उपचाराबाबत
मुंबई : राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आरोग्याच्या उपचाराबाबत व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय नुकताच राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर केला. औरंगाबाद जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात मानसिक आरोग्य सोयी-सुविधा भक्कम करण्यासाठी मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. याअंतर्गत राज्यात जिल्हास्तरीय १५ मानसिक आरोग्य मंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.
आरोग्यमंत्री म्हणाले की, मानसिक आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाय आणि समुपदेशनाची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने केलेल्या मानसिक आरोग्य अधिनियमनाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून यावर कार्यवाही सुरू आहे. राज्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. ती भरून काढण्याकरिता प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यांच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे प्राथमिक आरोग्य स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आजारावरील उपचारांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय या वेळी घेतला.
या बैठकीस आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. साधना तायडे, ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजित दांडेकर आदी या वेळी उपस्थित होते.
संस्थांसह रुग्णालयांचीही तपासणी
राज्यात स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणात एकूण २० सदस्य आहेत. त्यातील ९ पदसिद्ध सदस्य तर ११ निमशासकीय सदस्य आहेत. ही समिती जिल्ह्यातील मानसिक रुग्णालय, व्यसनमुक्ती केंद्रे, पुनर्वसन केंद्रे अशा मानसिक आजारांवर कार्यरत असणाºया संस्था तसेच रुग्णालयांची तपासणी करणार आहेत.