मेरा बेटा अब गोविंदा बनेगा: गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून शिंदे सरकारवर ‘वॉर’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:37 AM2022-08-24T07:37:46+5:302022-08-24T07:40:55+5:30
राज्य शासनाने दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
जळगाव :
राज्य शासनाने दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आला असून, गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून नेटिझन्सने शिंदे सरकारवर मीम्सद्वारे ‘वॉर’ सुरू केले आहेत. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच तापला असून, फेसबूकपासून ते ट्विटर, व्हॉटस्ॲपसह सर्वच सोशल साइटस्वर गोविंदा ट्रेडिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करताना, नेटिझन्सने गंमतीशीर मीम्सचा वापर करून, सोशल मीडियावर हास्याचा फव्वाराच मारला आहे.
दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे. अनेक विद्यार्थी संघटनांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेक निर्णयांवरून शिंदे सरकार चर्चेत असून, काही निर्णयाचे स्वागत होत आहे, तर काही निर्णयाला विरोधाचा सामनादेखील करावा लागत आहे.
भन्नाट मीम्स जोमात, शिंदे सरकार कोमात
१. सरकारी नोकरी मिळण्यासाठी दोनच मार्ग, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे किंवा गोविंदा पथक जॉइन करणे.
२. सूरपारंबी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असल्याचे म्हटले आहे.
३. मेरा बेटा गोविंदा बनेगा, असे म्हणत थ्री इडियटस् चित्रपटाचा एहसान कुरेशीचा फोटोच व्हायरल केला आहे.
४. तर काही नेटिझन्सनी दहीहंडीप्रमाणेच गोट्या खेळणाऱ्यांनाही शासकीय नोकरीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
५. काहींनी द ग्रेट खलीच्या जाहिरातीवरून मीम्स तयार करून आधी घरीच होतो, मात्र गोविंदा पथकात गेल्यानंतर सरकारी नोकरी मिळाल्याचा दावा केला.
१५० वय झालेल्यांना ‘मंगळ’ ग्रहाचा प्रवास मोफत
राज्य शासनाने ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ वय पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरदेखील नेटिझन्सने शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे. आता १०० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना विमानाचा प्रवास मोफत, १२५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना चंद्राचा प्रवास मोफत, तर १५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना थेट मंगळ ग्रहाचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय राज्य शासन घेणार असल्याचे मीम्स व्हायरल होत आहेत.