व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना दमदाटी
By Admin | Published: July 11, 2016 08:04 PM2016-07-11T20:04:27+5:302016-07-11T20:04:27+5:30
राज्य शासनाच्या जाचक अटींच्या विरोधात पंढरपुरातील पालेभाज्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 11- राज्य शासनाच्या जाचक अटींच्या विरोधात पंढरपुरातील पालेभाज्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी आपल्या पालेभाज्या व अन्य भाज्या विक्रीसाठी सोमवारी पंढरपूर नवीपेठ भाजी मार्केटमध्ये आणल्या होत्या. व्यापारी खरेदी करत नाहीत, त्यामुळे काही शेतकरी स्वत:च या भाज्या विकताना दिसत होते. मात्र त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी स्वत: भाज्या विकाल तर विस्कटून टाकू, असे म्हणत दमदाटी केल्याने शेतकऱ्यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या कालावधीत पंढरपूरमध्ये येणारे दहा लाखांपेक्षा अधिक भाविक दिंड्या, पालख्या यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला यांची गरज असते. मात्र त्याचवेळी राज्य शासनाने व्यापाऱ्यांवर लादलेल्या काही जाचक अटींच्या निषेधार्थ राज्यभरातील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. त्यानुसार पंढरपूरमध्येही सर्रास व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत पालेभाज्या मार्केट बंद ठेवले आहे. त्यामुळे विक्रीसाठी काही शेतकऱ्यांची तयार असलेल्या भाज्या, फळे आदी सोमवारी (दि. ११ जुलै) ही नेहमीप्रमाणे मेथी, कोथिंबिर, वांगी व अन्य पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला लक्षात येताच त्यांनी नवी पेठेतील भाजी मार्केटमध्ये तो माल विक्रीसाठी आणला.
काही व्यापारी जमाव करून बंद पाळण्याचा आदेश करत होते. मात्र व्यापाऱ्यांचा बंद असताना आमच्या भाजीपाल्याचे काय करायचे? असे म्हणत काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उभे रहात आपल्या पालभाज्या ओरडून विकण्यास सुरूवात केली. याचा राग मनात धरून व्यापाऱ्यांच्या जमावाने काहीवेळ शेतकऱ्यांना आवाहन केले की, तुम्ही या ठिकाणी तुमचा माल विकू नका, तरीही काही शेतकऱ्यांनी न ऐकल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी यापुढे अशीच तुमची पालेभाज्यांची विक्री सुरू राहिल्यास आम्ही रस्त्यावर विस्कटू, असे म्हणत दमदाटी केली. काही शेतकऱ्यांना शिव्याही दिल्या. त्यामुळे अगदी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये व्यापारी विरूद्ध शेतकरी असा सामना पहावयास मिळाला.
आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या पालख्या, दिंड्या, त्यामधील लाखो भाविक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवश्यकता असते. मात्र व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद शेतकरी स्वत:च्या भाजीपाल्याची विक्री करण्यालाही व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध आहे. ही व्यापारी व शेतकरी असाच संघर्ष सुरू राहिल्यास भाविकांना भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
व्यापाऱ्यांची दादागिरी
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अनेक बागायतदार शेतकऱ्यांनी आषाढीत भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो, याशिवाय कमी कालावधीत व कमी पाण्यावर मिळणारे पीक म्हणून कोथिंबीर, मिरची, मेथी, वांगी, बटाटी, कोबी, आले, दोडका, गवार, कांदा आदी भाजीपाल्याची लागवड केली होती. ती विक्रीसाठी आल्यानंतर मात्र ऐन आषाढीच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात बंद पुकारला. त्यात आमची काय चूक, असे म्हणत काही शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला स्वत: विकण्यास सुरूवात केली. त्यासही व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. काही व्यापाऱ्यांनी तर दमदाटी करत शिवीगाळी शेतकऱ्यांना केली. व्यापाऱ्यांच्या या दादागिरीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज
व्यापाऱ्यांच्या मागण्यांना आषाढीत येणाऱ्या भाविकांचा वा शेतकऱ्यांचा कसलाही विरोध नाही. मात्र आषाढी यात्रा कालावधीत त्यांनी पुकारलेला बंद योग्य नसल्याचे काही शेतकरी व भाविकांचे म्हणणे आहे. मात्र व्यापाऱ्यांची अशीच आडमुठी भूमिका राहिल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना जेवढा बसणार आहे, तेवढाच भाविकांनाही बसणार आहे. यामुळे यात्रा कालावधीत हा संघर्ष थांबवायचा असल्यास जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने समन्वयाची भूमिका साधून तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा यात्रेत अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ शेतकरी व भाविकांवर येणार आहे.