दहा कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 09:30 PM2016-07-29T21:30:18+5:302016-07-29T21:30:18+5:30
ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील सव्वातीन लाखांची रोकड लुटणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ ने अटक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ : ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील सव्वातीन लाखांची रोकड लुटणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ ने अटक केली आहे. पैसे लुटल्यानंतरही त्याला घरात कोंडून त्याच्याकडे १० कोटींच्या खंडणीची त्यांनी मागणी केली होती. मात्र, त्याने प्रसंगावधान राखून पैसे घरी असल्याची बतावणी केल्यामुळे सुदैवाने त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात तो यशस्वी ठरला.
हेमंत ऊर्फ मुसा गवळी (३४), नितेश पाटील (२४), वेताळ रमेश पाटील (२३), सतीश ऊर्फ सत्या पहुडकर (२२) अशी त्या चौघा अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.
एका नामांकित कंपनीत वितरक म्हणून नोकरीला असलेले मयूर राणे (२२) हे ठाण्याच्या वाघबीळ भागातील पूजा रेसिडेन्सी सोसायटीत वास्तव्याला आहेत. महिनाभरापूर्वी त्यांची हेमंत ऊर्फ मुसा जगन्नाथ गुळवी याच्यासोबत कामानिमित्त ओळख झाली होती. यातूनच हेमंतने मयूर यांची सविस्तर माहिती मिळवून त्यांच्या अपहरणाचा कट रचला. ठरल्याप्रमाणे २३ जुलैला भिवंडी-मानकोली भागातून त्यांचे कारमधून त्याने अपहरण केले.
कारमध्ये त्यांना सत्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला. तसेच मयूर यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागितली. पैसे देत नाही तोपर्यंत त्यांना भिवंडीतील खानिवली येथील एका घरात कोंडून ठेवले. परंतु, आता आपल्याकडे पैसे नाहीत, घरी आहेत, अशी बतावणी अपहरणकर्त्यांना त्यांनी केली. पैसे घरी असल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांना घोडबंदर येथील त्यांच्या घरी नेले. त्याच वेळी मयूर यांनी प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून दाराची कडी आतून लावून घेतली. त्यानंतर, लगेचच त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. याची कुणकुण अपहरणकर्त्यांना लागताच त्यांनी तेथून पळ काढला.
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला. युनिट-५ चे सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या पथकाने २८ जुलै रोजी दुपारी १ वा.च्या सुमारास चौघांनाही भिवंडीतून अटक केली. तर, दोघा फरारींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी सांगितले. यातील मुसा गवळी हा पूर्वी भिवंडीतील सुजित पाटील याच्या टोळीत गुन्हेगारी कारवाया करीत असल्याची माहिती तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.