पुण्याचा पारा ४२.१ अंशावर
By Admin | Published: April 22, 2016 01:12 AM2016-04-22T01:12:00+5:302016-04-22T01:12:00+5:30
पुण्यासह जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी शहराचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले
पुणे : पुण्यासह जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी शहराचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे आजही पुणेकरांच्या घामाच्या धारा वाहत होत्या. मात्र, पुढील २४ तासांत शहराच्या तापमानात घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
आज शहराच्या मध्यवर्ती भागाचे तापमान ४० अंश, तर लोहगाव येथील तापमान ४२.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तापमान ५-६ दिवसांपासून सातत्याने ४१ अंशांच्या घरात राहिल्याने पुण्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. उकाडा प्रचंड वाढल्याने दुपारी शहरात अघोषित संचारबंदी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्याचे लोक टाळत आहेत. दिवसाच्या तापमानाबरोबर रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे.
किमान तापमान २४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या उकाड्यातून पुणेकरांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुढील ३ दिवस शहराचे कमाल तापमान घटून ३७ ते ३८ अंशांच्या आणि किमान तापमान १८ ते १९ अंशांच्या घरात येईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.(प्रतिनिधी)