मतदानाचा ‘पारा’ वाढला!

By admin | Published: February 17, 2017 02:48 AM2017-02-17T02:48:26+5:302017-02-17T02:48:26+5:30

राज्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी आज अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. उन्हाचा पारा चढलेला असतानादेखील

'Mercury' of voting increased! | मतदानाचा ‘पारा’ वाढला!

मतदानाचा ‘पारा’ वाढला!

Next

मुंबई : राज्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी आज अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. उन्हाचा पारा चढलेला असतानादेखील त्याची तमा न बाळगता मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून, सरासरी ६९ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आजवर या निवडणुकीत सरासरी ५८ ते ६५ टक्के मतदान होत असे.
जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ला अत्यंत उत्साहाच्या वातावरणात मतदानाला सुरुवात झाली. मतदार याद्यांमधील घोळ, अनेकांची नावे गहाळ असणे, यामुळे काही जिल्ह्यांमध्ये गोंधळाची परिस्थितीही दिसून आली. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील १ हजार ७१२ जागांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले आहे. निर्णय २३ फेब्रुवारीला होईल.
जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने अनेक ठिकाणी घोळ झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाले होते. तामसवाडी ता. पारोळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तामसवाडी हे गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचे गाव आहे. दुसरीकडे भुसावळ तालुक्यात आमदार संजय सावकारे व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. आव्हाणे, नशिराबाद या दोन गावांमध्ये तर काहीवेळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली होती.
केंद्रप्रमुखाचा मृत्यू
झाडी ता. अमळनेर येथील निवडणूक केंद्रप्रमुख लक्ष्मण बाविस्कर (३५) यांचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आचारसंहिता भंगाविषयी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान
बुलडाणा : जिल्ह्यात दोन ठिकाणी वधु-वरांनी लग्नाआधी मतदानाचा अधिकार बजावला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कल येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने गुरुवारी सकाळी मतदान केले व त्यानंतर तो बोहल्यावर चढला. असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची मुलगी अनिताने लग्नाच्या दिवशी आधी मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतरच ती लग्न मंडपात गेली. परभणीतील राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील व्यापारी मारोतीअप्पा धुळे यांचे चिरंजीव अमोल धुळे यांनीही दुपारी विवाहाला जाण्यापूर्वी वाजत-गाजत वरातीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: 'Mercury' of voting increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.