'मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करुन दाखवा'; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:59 PM2021-09-08T12:59:36+5:302021-09-08T14:37:13+5:30
Belgaum Municipal Election: 'बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली.'
मुंबई: नुकतंच बेळगाव महापालिकेचा निकाल लागला. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं. त्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे ना, मग मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा', असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
https://t.co/6KbutjI4Uq
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
'सरकारला जागेवर आणण्याचे काम मी करत आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोप उडाली आहे.'#KiritSomaiya#Shivsena#BJP4Maharashtra
बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली. त्यानंतर भाजपनेही पलटवार करत निवडून आलेले निम्म्याहून अधिक उमेदवार मराठी असल्याचं सांगितलं. तसेच, बेळगाव पालिकेवर भगवा फडकला असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राऊत यांनी ट्विट करुन भाजपला बेळगाव महाराष्ट्र विलीन करण्याचं आव्हान दिलं आहे.
राऊत यांचे ट्विट...
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ''बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!'', असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.
बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर संजय राऊत यांच्यावर टीका करताना बेळगावमध्ये निवडूण आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील असे नगरसेवक मराठी माणसं वाटत नाहीयेत का? शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? असा सवाल केला.
महाराष्ट्राच्या मतदारने युतीला बहुमत दिलं, पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाही तर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़ेशाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे, असा इशारा पडळकरांनी राऊत आणि शिवसेनेला दिला आहे.