‘कॉमन मॅन’ अनंतात विलीन
By admin | Published: January 28, 2015 05:26 AM2015-01-28T05:26:34+5:302015-01-28T05:26:53+5:30
व्यंगचित्राच्या सशक्त माध्यमातून मार्मिक भाष्य करणारे आर. के. लक्ष्मण सोमवारी वयाच्या ९४व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.
पुणे : कमीत कमी रेषा आणि मोजक्या शब्दांतून राजकारणातील व्यंगावर नेमकेपणाने बोट ठेवणारे व व्यंगचित्राच्या सशक्त माध्यमातून मार्मिक भाष्य करणारे आर. के. लक्ष्मण सोमवारी वयाच्या ९४व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.
‘कॉमन मॅन’ला नवी ओळख देणाऱ्या या महान व्यंगचित्रकाराच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले, तेव्हा पोरके झाल्याची भावना असंख्य सामान्यजनांनी अनुभवली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय, सामाजिक तसेच इतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांच्या बरोबरीने सामान्य माणसांची लागलेली रीघ त्याच भावनेची साक्ष देत होती. रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती वयोमानपरत्वे खालावली होती. तब्बल १२ वर्षांपूर्वी आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतरही त्यांच्या कुंचल्याने विश्रांती घेतली नव्हती. फुप्फुसाच्या व मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासल्यानंतरही त्यांची व्यंगचित्रांची साधना यथाशक्ती सुरूच होती. पण आठ दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कमला, मुलगा श्रीनिवास आणि सून असा परिवार आहे. देशभरातील असंख्य चाहते हा त्यांचा विस्तारित परिवार होता. अखेरच्या काळातील वास्तव्यातून त्यांचे पुण्याशी खास नाते जुळले होते. राजकीय ढोंगाला व्यंगाने फटकारणाऱ्या, मतलबी नखरेलपणाचा नक्षा उतरविणाऱ्या व्यंगचित्राच्या दर्शनाशिवाय अनेकानेक वर्षे वाचकांच्या दिवसाची सुरुवात झाली नव्हती. पण ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून शहाणपण बहाल करणाऱ्या या व्यंगचित्रकाराच्या निधनाचे वृत्त देण्यासाठी २७ तारखेच्या सकाळी वृत्तपत्रेच नव्हती. प्रजासत्ताक दिनाच्या सुटीमुळे वर्तमानपत्रांचा अंक प्रसिद्ध झाला नाही. एकापरीने ही लक्ष्मण यांना वृत्तपत्र जगताने वाहिलेली मूक श्रद्धांजली ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.
> सिम्बायोसिसमध्ये सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यानंतर दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तिरंग्यात ठेवलेले आर. के. यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन करीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.