"मेरी कौम चिल्ला रही है.." विधानसभेत अबु आझमी-नितेश राणे भिडले; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:29 PM2023-08-02T13:29:16+5:302023-08-02T13:29:45+5:30
नितेश राणे भाषण करत असताना अबु आझमींकडे बोलून इशारे देत होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी तुम्ही माझ्याकडे बघून भाषण करा अशा सूचना नितेश राणेंना केल्या.
मुंबई – विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबु आझमी भिडले. औरंगजेबाचा फोटो लावून काहीजण महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत. वंदे मातरम म्हणणार नाही असं बोलतात. औरंग्या तुमचा बाप आहे अशा घोषणा दिल्या जातात. हे शिवरायांच्या महाराष्ट्रात चालणार नाही. ज्यांना या घोषणा द्यायच्या आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी खडेबोल सुनावले.
नितेश राणे भाषण करत असताना अबु आझमींकडे बोलून इशारे देत होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी तुम्ही माझ्याकडे बघून भाषण करा अशा सूचना नितेश राणेंना केल्या. नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवले जाते. राज्याचे वातावरण खराब केले जाते. पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केलीय. परंतु असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाही. पण मिरवणूक काढली जाते तेव्हा सर तन से जुदा अशाप्रकारे घोषणा देतात. हे लोक गद्दार आहेत. सगळे मुद्दाम घडवले जातेय. औरंग्या तुम्हारा बाप आहे अशा गोष्टी राज्यात चालल्या आहेत. या लोकांनी पाकिस्तानात निघून जावे. आमच्या मतांवर निवडून येता आणि असे बोलता. या लोकांचे लाड मुद्दामहून सुरू आहेत. औरंग्याचे प्रेम असेल तर पाकिस्ताना जात, इथे कशाला हवेत असं त्यांनी म्हटलं.
तर काही मुस्लीम तरूणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर ओरंगजेबाच्या कबरीवर गेले. माथा टेकवला. त्यांनी हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असं आव्हान दिले. या देशात २ कायदे चालतात का? ज्याने स्टेटस ठेवले त्यांच्यावर गुन्हा आणि जे आव्हान देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. २४ तास द्वेष पसरवला जातोय. त्यामुळे ट्रेनमध्ये गोळीबार झालाय. मुस्लीमांना हिंदुमध्ये बदनाम करायचे हे काम भाजपा करते. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. ट्रेनमध्ये बुरखा घालून, दाढी वाढवून फिरता येत नाही. मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदत करनेवाला नही है. नथुराम गोडसेचा फोटो लावतात. हे जाणुनबुजून केले जातेय. देशाचे वातावरण खराब केले जातेय असं आमदार अबु आझमींनी म्हटलं.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत. ते जेव्हा ते तिकडे गेले. तेव्हा तुम्ही महिमामंडन करू नका असं मी बोललो होतो. औरंगजेब शासक होता. २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्याठिकाणी माथा टेकवणे गुन्हा नाही. आपण लोकशाहीत निवडून येतो. पण काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. राष्ट्रहिताबाबत तडजोड करू नये. देशाच्या इतिहासात अनेक मुस्लीम नेते आहेत ज्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिलय. त्यामुळे मतांच्या लांगुनचालनासाठी चुकीच्या भूमिकेचे समर्थन करू नका. राष्ट्रहिताविरोधात जाणाऱ्या कुठल्याही धर्माचा असेल तर त्याला सोडले जाणार नाही. जाणीवपूर्वक असे केले जात असेल तर चालणार नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अबु आझमींना दिले.