अभियांत्रिकी प्रवेशाचा गोंधळ अद्याप मिटेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:37 AM2018-08-13T06:37:27+5:302018-08-13T06:37:42+5:30
डिप्लोमा इंजिनीअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीकरिता थेट प्रवेश दिला जातो. या वर्षी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून...
मुंबई : डिप्लोमा इंजिनीअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीकरिता थेट प्रवेश दिला जातो. या वर्षी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून, विद्यार्थ्यांना रात्री एका कॉलेजमध्ये तर सकाळी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश, काहींना एकाच वेळी दोन कॉलेजमध्ये प्रवेश, असा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबत शिवसेना आक्रमक झाली आहे. आमदार विलास पोतनीस यांनी तंत्रशिक्षण संचालकांची नुकतीच भेट घेऊन याबाबत लवकर कारवाई करण्याची मागणी केली. प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी तंत्रशिक्षण संचालनाने घ्यावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे पोतनीस यांनी दिला आहे.
तंत्रशिक्षण संचानालयाचे, संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी फोर पिलर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, सॉफ्टवेअर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वाघ यांनी दिली.