साठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाचा संदेश
By admin | Published: July 28, 2016 01:23 AM2016-07-28T01:23:08+5:302016-07-28T01:23:08+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवारी उपसंचालक कार्यालयाने प्रवेश घेण्यासाठी
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवारी उपसंचालक कार्यालयाने प्रवेश घेण्यासाठी मेसेज पाठवले आहेत. चार गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नव्हते. त्यापैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत जागा रिक्त असल्याचा उल्लेख केलेला मेसेज पाठवला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, उरलेल्या सुमारे ९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९ आॅगस्ट रोजी नव्याने आॅनलाइन अर्ज नोंदणी करून प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. तर प्रवेशाचा मेसेज पाठवलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. जे विद्यार्थी प्रवेश निश्चित करणार नाहीत, त्यांनाही ९ आॅगस्ट रोजी नव्याने नोंदणी करून विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.
याआधी अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइनच्या एकूण २ लाख ६९ हजार ७७२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ५० हजार २३४ जागा आॅनलाइन पद्धतीने, तर १ लाख १९ हजार ५३८ जागा अल्पसंख्याक, इन हाऊस, व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येणार होत्या. या जागांसाठी या वर्षी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र त्यातील केवळ १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता. त्यामुळे १ लाख १६ हजार ४४६ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यातील
६० हजार ७९४ जागांसाठी नॉट
रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे यांमधील
किती विद्यार्थी पुन्हा प्रवेश घेणार, याची माहिती गुरुवारनंतरच समोर येईल. (प्रतिनिधी)
विशेष फेरीसाठी ५० हजार जागा
अद्यापही अर्धवट अर्ज भरलेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांसाठी जाहीर होणाऱ्या पाचव्या गुणवत्ता यादीसाठी सुमारे ५५ हजार ६५२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे मेसेज पाठवलेले नॉट रिपोर्टेड विद्यार्थी आणि पाचव्या गुणवत्ता यादीतील सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतरही ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीसाठी ५० हजारांहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे निदर्शनास येते.
उपसंचालक कार्यालयात शांतता
गेल्या आठवडाभरापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर पालक व विद्यार्थ्यांची धुमश्चक्री सुरू होती. मात्र बुधवारी या ठिकाणची पालक व विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती.
प्रवेशासाठी उपसंचालक कार्यालयाने केलेल्या मेसेजमुळे बहुतांश विद्यार्थी व पालक शांत झाल्याचे दिसले. तरी यापुढील प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळतील, अशी अपेक्षा उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली.