अमृता फडणवीस यांचा ‘विविधतेतून एकते’चा संदेश
By admin | Published: February 6, 2017 12:52 AM2017-02-06T00:52:17+5:302017-02-06T00:52:17+5:30
सगळ्या जगात हिंसाचार, द्वेष पसरलेला असताना विविधतेतून एकता हा छान संदेश फक्त भारतातून जगाला दिला जाऊ शकतो.
मुंबई : सगळ्या जगात हिंसाचार, द्वेष पसरलेला असताना विविधतेतून एकता हा छान संदेश फक्त भारतातून जगाला दिला जाऊ शकतो. आणि हा संदेश गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट फॉर वर्ल्ड पीसमध्ये अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस यांनी दिला. जगात या कार्यक्रमाला मोठी प्रतिष्ठा आहे. अमृता फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत.
या कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘‘भारताची संस्कृती महान आणि व्यापक आहे. २९ राज्ये, २२ भाषा, १६०० बोलीभाषा अशी विविधतेत एकता आहे. आम्ही दिवाळी, ईद, ख्रिसमस एकाच उत्साहात साजरा करतो. येत्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी एकीने राहण्याची गरज आहे.’’
अमृता फडणवीस यांनी स्त्री-पुरुष भेद मिटविण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘‘मी एक आई तसेच आम्ही सगळ्या आया या आपल्या मुलांच्या कल्याणात आनंद शोधत असतो. चांगले जग निर्माण व्हायला हवे; कारण आज जगात ४० टक्के मुलींना शाळेतच जायला मिळत नाही आणि ७० टक्के महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागते.’’ मन:शांती आणि आनंद प्राप्त करायचा असल्यास मानवतेच्या कल्याणासाठी नि:स्वार्थ भावनेने सगळ्यांनी काम केले पाहिजे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.
फडणवीस शेतकऱ्यांबद्दल बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात आजही ५० टक्क्यांपेक्षा जास्त खेडी दुष्काळाला तोंड देत आहेत.’’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षस्थानी होते.
फडणवीस यांनी आपल्या भाषणाचा शेवट भारताच्या पाच हजार वर्षांच्या समृद्ध वारसा व परंपरेचा उल्लेख करून केला. या कार्यक्रमात फडणवीस यांनी अमेरिकेचे सिनेटर्स आणि सलोखा व शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी जगातून आलेले वेगवेगळ्या देशांचे नेते यांच्याशी चर्चा केली.
त्या म्हणाल्या, ‘प्रेमाची शक्ती’ अशा या कार्यक्रमात बोलायची विशेष संधी मला मिळाली आणि मी माझे भाषण जय हिंद, जय भारत म्हणून संपवले. अध्यक्ष ट्रम्प यांचे भाषण ऐकणे हा आनंद होता.’’