व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश
By admin | Published: May 16, 2016 03:41 AM2016-05-16T03:41:20+5:302016-05-16T03:41:20+5:30
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे.
डोंबिवली : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे. त्याचा प्रारंभ शनिवारी झाला. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.
गणेश जोशी यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इंदूर, दिल्ली येथील ५० व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्रात असाच भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख व व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळाची दाहकता दाखवणारे व्यंगचित्र रेखाटले होते. ते व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहता येईल.
प्रदर्शनाच्या सुरुवातीस हे व्यंगचित्र मांडले आहे. त्याचबरोबर मंगेश तेंडुलकर, गणेश जोशी, प्रभाकर वाईरकर, व्ही.ए. हसबनीस, सुरेश सावंत, निलेश जाधव, श्रीनिवास प्रभुदेसाई, सुधाकर सोनी आदी प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय, लहानगे व्यंगचित्रकार प्रथमेश काटकर आणि श्वेता शेवाळे यांचीही व्यंगचित्रे आहेत. (प्रतिनिधी)