चिमुकल्यांनी भिंत रंगवून ठाणेकरांना दिला जलसाक्षरतेचा संदेश
By Admin | Published: May 16, 2016 03:24 AM2016-05-16T03:24:42+5:302016-05-16T03:24:42+5:30
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे
ठाणे : महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. पाणीबचतीसाठी ठाणे शहरात सोसायटीस्तरावर विविध उपाय व उपक्रम योजिले जात असून ठाण्यातील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झोरिया या सोसायटीतील चिमुकल्यांनी या जनजागरणासाठी पुढाकार घेतला. आपल्या सोसायटीच्या १५० फुटांच्या भिंतीवर पाणीटंचाईसारखी भीषण समस्या त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारली आहे.
ढोकाळी येथील या सोसायटीतील चार ते १७ वर्षे वयोगटांतील जवळपास १५ मुलांनी सोसायटीमधील १५० फुटांची भिंत रंगवली आहे. या भिंतीवर पाणीटंचाई हा विषय घेऊन आपापल्या कल्पकतेतून चित्रे रेखाटून सर्वांचेच डोळे उघडले आहे. पाणी हे सर्वांसाठीच आहे, त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे.
पाणी हे केवळ मानवासाठीच आवश्यक नसून प्राणी आणि पक्ष्यांसाठीदेखील गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचाही विचार मानवाने केला पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश या चिमुकल्यांनी चित्रांतून दिला आहे.
‘पावसाचे पाणी वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘झाडे नाहीतर पाऊस नाही आणि पाऊस नाही तर पाणी नाही’, ‘निसर्गावर प्रेम करा’, ‘नळाची गळती थांबवा’ आदी संदेश चित्रांतून रेखाटले आहे. आठ दिवसांत ही चित्रे
या मुलांनी रेखाटली आहे. ती चित्रे रेखाटताना प्रत्येक मुलाने पाणी वाचवणे, ही आपली जबाबदारी असल्याचे मनाशी पक्के केले. मुलांच्या या उपक्रमाला त्यांच्या पालकांनी आणि सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांनीही पाठिंबा दिला.