वाळुशिल्पातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 02:14 AM2016-10-03T02:14:14+5:302016-10-03T02:14:14+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त महात्मा गांधीजींना गिरगाव चौपाटी येथे वालुकाशिल्पाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.
मुंबई : स्वच्छ भारत अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त महात्मा गांधीजींना गिरगाव चौपाटी येथे वालुकाशिल्पाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. जागतिक कीर्तीचे वालुका शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी हे शिल्प तयार केले आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे गिरगाव चौपाटी येथे स्वच्छ भारत अभियान आणि निर्मल सागर तट अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी वालुकाशिल्प साकारण्यात आले आहे.
स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे गेले १५ दिवस सुरू असलेल्या निर्मल सागर तट अभियानाचा वालुकाशिल्प साकारून समारोप करण्यात आला. वालुकाशिल्प साकारण्याआधी चौपाटीची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्यासह नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सुदर्शन पटनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे १० ट्रक वाळू वापरून १० फूट उंच व ४० फूट रुंद असे भव्य वालुकाशिल्प साकारले आहे. तिरंग्यासह विविध रंगांत साकारलेले हे वालुकाशिल्प गांधी जयंतीपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. सुदर्शन पटनाईक निर्मल सागरी तट अभियानाचे ब्रँड अॅम्बॅसिडर असून, त्यांनी कोकण किनाऱ्यांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी वालुकाशिल्पाद्वारे संदेश देत असल्याचे पटनाईक यांनी सांगितले.